मेटाच्या स्मार्ट ग्लासेसची क्रांती; सार्वजनिक ठिकाणी लोकांचे व्हीडिओ काढणे योग्य आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ऑलिव्हिया कोपलँड
- Role, बीबीसी न्यूज एनआय
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
स्मार्ट चष्म्यांची (ग्लासेस) ही नवीन लाट आता तुमच्या आसपासच्या रस्त्यांवर, पार्कमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणीही दिसू शकते. परंतु, स्मार्ट ग्लासेसच्या या भविष्याबद्दल काही जणांच्या मनात चिंता आहे.
हे तंत्रज्ञान वापरून फोन (कॉल) करता येतो, हँड्स-फ्री पद्धतीने एआयशी संवाद साधता येतो आणि ग्लासेसच्या फ्रेमला स्पर्श करून फोटो-व्हीडिओही काढता येतात. त्यामुळे गोपनीयतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
यूकेमध्ये सुमारे 800 पब चालवणाऱ्या वेदरस्पूनने आपल्या पबमध्ये या ग्लासेसने व्हीडिओ काढण्यास बंदी घातली आहे.
तसेच, महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या ग्लासेसचा गैरवापर करून महिलांना त्रास दिला जाऊ शकतो, छळ केला जाऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली आहे.
पण टिकटॉक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंटेंट क्रिएटर्सचे व्हीडिओ लोकप्रिय होत असल्याने, सार्वजनिक ठिकाणी या ग्लासेसचा योग्य वापर कसा करायचा, याविषयीची चर्चा पुढेही सुरूच राहणार आहे.
पिअर्स व्हॅलेली हा अशाच कंटेंट क्रिएटर्सपैकी एक आहे. वेस्ट बेलफास्टमधील बॅलीमर्फी येथे राहणारा 31 वर्षीय पिअर्स सोशल मीडियावरील कामातून आपला उदरनिर्वाह करतो.
तो मेटा-रे-बॅनचा स्मार्ट ग्लासेस वापरतो. त्याच्या बहुतेक व्हीडिओंमध्ये त्याच्या ग्लासेसमधून दिसणारे रस्त्याचे दृश्य दिसते. रस्त्यावरून ये-जा करताना तो वाटेत भेटणाऱ्या लोकांना यमक जुळणाऱ्या शब्दांचा वापर करून मजेदार पद्धतीने नमस्कार करताना दिसतो.
बेलफास्ट शहराच्या मध्यवर्ती भागात शूट केलेल्या त्याच्या एका व्हीडिओला टिकटॉकवर तब्बल 6 लाख व्ह्यूज मिळाले होते.

फोटो स्रोत, Pearse Vallely
या व्हीडिओंच्या यशामागे त्याचा साधा आणि मजेशीर अंदाज आहे. पिअर्स सांगतो की, एखाद्याने व्हीडिओ काढू नका असं सांगितल्यानंतर त्याने तो व्हीडिओ कधीही पोस्ट केलेला नाही. तसेच, आतापर्यंत एकाही व्यक्तीने व्हीडिओ काढून टाकण्यासाठी संपर्कही केलेला नाही.
"मला वाटतं, मी त्यांच्याशी ज्या पद्धतीने बोलतो, त्यामुळे हे शक्य होतं. मी त्यांची खिल्ली उडवत नाही, हे त्यांना माहीत असतं. मी हे सगळं सकारात्मक पद्धतीने करतो."
व्हॅलेली वापरत असलेले मेटाचे स्मार्ट ग्लासेस सध्या स्मार्ट ग्लासेसच्या बाजारपेठेत सर्वाधिक लोकप्रिय आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 70 लाखांहून अधिक चष्मे विकल्या गेल्या आहेत.
मेटाचे ग्लासेस कसं काम करतात?
या स्मार्ट ग्लासेसची किंमत काहीशे पाउंड आहे. प्रसिद्ध सनग्लासेस ब्रँड रे-बॅन बनवणाऱ्या कंपनीसोबत मिळून हे चष्मे तयार करण्यात आले आहेत. या ग्लासेसच्या फ्रेममध्ये छोटा कॅमेरा बसवलेला आहे. फ्रेमला स्पर्श करून हा कॅमेरा सुरू करता येऊ शकतो.
यामुळे ग्लासेसवर पांढरा दिवा चमकू (पल्सिंग व्हाईट लाईट) लागतो. व्हीडिओ रेकॉर्ड होत आहे, हे आजूबाजूच्या लोकांना कळावे, हा त्यामागचा उद्देश आहे. फोटो काढताना फ्लॅशही सुरू होतो. मेटाच्या प्रवक्त्याने सांगितलं, 'स्मार्टफोन्स आणि इतर कॅमेऱ्यांमध्ये अशी सुविधा नसते'.
मेटाने अलीकडेच या ग्लासेसमध्ये एक अपडेट केलं आहे. या ग्लासेसवरील इंडिकेटर लाइटशी छेडछाड केल्यास कॅमेरा आपोआप बंद होईल, असं कंपनीने सांगितलं आहे.
मेटाच्या स्मार्ट ग्लासेसप्रमाणेच एआय किंवा स्मार्ट ग्लासेस बनवणाऱ्या इतर कंपन्यांची उत्पादनेही मोठ्या प्रमाणावर विकली जाण्याची शक्यता आहे. संशोधकांच्या मते, पुढील काही वर्षांत तब्बल 10 कोटी लोक स्मार्ट ग्लासेसची जोडी खरेदी करू शकतात.
व्हॅलीच्या व्हीडिओंमध्ये लोकांशी होणारा संवाद हा उत्स्फूर्त आणि नैसर्गिक असणं महत्त्वाचं असतं. ते सांगतात की, त्यांच्या ग्लासेसवरचा दिवा दिसत असल्यामुळे अनेकांना आपण व्हीडिओ रेकॉर्ड करत आहोत, याची कल्पना असते.
ते असंही सांगतात की, व्हीडिओ शूट केल्यानंतर शक्य असेल तर तो त्या व्यक्तीला आपण त्यांचा व्हीडिओ रेकॉर्ड केला आहे, याची माहिती देण्याचा प्रयत्न करतो.
उत्तर आयर्लंडमध्ये सार्वजनिक ठिकाणी एखाद्याचा, अगदी गुपचूपही, व्हीडिओ काढणे साधारणपणे कायदेशीर आहे. कारण सार्वजनिक ठिकाणी असलेल्या व्यक्तीला आपल्या गोपनीयतेचा पूर्ण हक्क असेल, अशी साधारणपणे अपेक्षा करता येत नाही.
पण, एखाद्याचा व्हीडिओ काढणे हे छळ, पाठलाग किंवा एखाद्याच्या खासगी क्षणांचे चित्रीकरण मानले गेले, तर ते अवैध ठरू शकते. त्याचबरोबर, ज्या ठिकाणी व्यक्तीला गोपनीयतेची वाजवी अपेक्षा असते, अशा ठिकाणीही चित्रीकरण करणे कायदेशीर ठरणार नाही.

"एखाद्या व्यक्तीसोबत 30 सेकंदांचा संवाद झाला, तर त्यात काही चुकीचं नाही," असं व्हॅलेलीने म्हटलं.
"मला वाटतं, तंत्रज्ञानामुळे आपण ही गोष्ट हळूहळू विसरत चाललो आहोत. त्यामुळे तंत्रज्ञानाचाच वापर करून ती पुन्हा जिवंत करण्याचा मी प्रयत्न करतोय."
व्हॅलेली म्हणाला की, लोक उद्धटपणे किंवा गैरवर्तन करत असतील, तर मेटा ग्लासेस वापरण्यावर बंदी घालण्यामागचं कारण मला समजू शकतं. परंतु, एखाद्याचा व्हीडिओ काढण्यामागचा उद्देश काय आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे.
"लोकांना माहीत असतं की, हा व्हीडिओ मी काढतोय. परंतु, काही लोक ट्रोल अकाउंट्सच्या नावाने असे व्हीडिओ करतात. कितीही नवं तंत्रज्ञान आलं, तरी काही लोक त्याचा चुकीच्या कारणांसाठी वापर करणारच."
तरीही, व्हॅलेलीने त्याला आतापर्यंत कोणाचाही विरोध झालेला नसल्याचं सांगितलं आहे. तरीही, या ग्लासेसने व्हीडिओ काढणारे लोक आणि सामान्य नागरिक यांच्यात वाद किंवा नाराजी वाढत असल्याचे काही अहवाल समोर येत आहेत.
गेल्या डिसेंबरमध्ये न्यूयॉर्कच्या सबवेमध्ये एका महिलेनं एका व्यक्तीचा मेटा स्मार्ट ग्लास तोडून त्याचे दोन तुकडे केले होते. त्यानंतर लोकांनी त्या महिलेला 'हिरो' म्हणत कौतुक केलं होतं.
जुलैमध्ये स्कॉटलंड पोलिसांनी एका टिकटॉकरविरोधात चौकशी सुरू केली. या टिकटॉकरने मेटा ग्लासेसचा वापर करून सार्वजनिक ठिकाणी असलेल्या लोकांचे गुपचूप व्हीडिओ रेकॉर्ड केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.
कंपनीने आपल्या ठिकाणी या ग्लासेसने व्हीडिओ काढण्यावर बंदी घातली आहे. याबाबत वेदरस्पून्सच्या प्रवक्त्याने सांगितलं की, स्मार्ट ग्लासेसमुळे लोकांवर गुपचूप नजर ठेवणं शक्य होत असल्याने ते 'सामान्य समजुतीच्या विरुद्ध' आहे. तसेच, उत्तर आयर्लंडमधील कॉमिक कॉनचे आयोजन करणाऱ्या मोनोपॉली इव्हेंट्सनेही गुपचूप व्हीडिओ रेकॉर्ड केला जाऊ शकतो, या भीतीमुळे आपल्या कार्यक्रमांमध्ये हे ग्लासेस घालण्यावर बंदी घातली आहे.
दरम्यान, टिकटॉकवर काही यूजर्स महिलांकडे जाऊन त्यांचा फोन नंबर मागतात आणि त्यांच्यावर केलेल्या फ्लर्टिंगच्या प्रयत्नांवर त्यांची प्रतिक्रिया रेकॉर्ड करतात. असे व्हीडिओ अनेकदा #howtogetagirlfriend या हॅशटॅगसह पोस्ट केले जातात आणि त्यांना हजारो व्ह्यूज मिळू शकतात.
महिलांना त्रास दिला जाण्याची चिंता
महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या वुमेन्स रिसोर्स अँड डेव्हलपमेंट एजन्सीच्या लॉबिस्ट एलेन क्रोरी म्हणाल्या की, हे स्मार्ट ग्लासेस कधी आणि कसे वापरले जात आहेत, याबाबत लोकांमध्ये पुरेशी जागरूकता नाही. त्यामुळे एखाद्याची संमती घेण्याच्या मुद्द्यावरही समस्या निर्माण होत आहेत.
"आत्ता तुम्ही कॅमेरा किंवा फोनने व्हीडिओ काढत असाल, तर ते माझ्या सहज लक्षात येतं आणि मी तिथून दूर जाऊ शकते. पण एआय कॅमेऱ्याने तुमचा व्हीडिओ काढला जात असेल, तर त्याची तुम्हाला कल्पनाही नसू शकते."
त्यांनी असंही सांगितलं की, या ग्लासेसचा वापर सध्या अवैध असलेल्या गोष्टींसाठी, जसं की एखाद्या महिलेच्या कपड्यांखालून गुपचूप फोटो किंवा व्हीडिओ काढण्यासाठी (अपस्कर्टिंग), केला जात असल्याचीही चिंता आहे.

क्रोरी म्हणाल्या की, सोशल मीडिया कंपन्यांकडे तक्रार करून असे व्हीडिओ हटवण्याची मागणी करता येते. काही ठिकाणी परिस्थितीनुसार सूचना फलकही लावण्यात आले आहेत. परंतु त्यांना असं वाटतं की, या तंत्रज्ञानाच्या वेगाने कायदे मात्र बदललेले नाहीत.
"रस्त्यावर, बसमध्ये किंवा वर्गात एखाद्या व्यक्तीचा व्हीडिओ काढला गेला, तरी त्या व्यक्तीला कायदेशीररीत्या त्याविरोधात काही करता येत नाही," असं त्या म्हणाल्या.
न्याय विभागाने (डीओजे) सांगितलं की, मेटा स्मार्ट ग्लासेसच्या वापराबाबतचे नियम ठरवणे हा थेट न्याय विभागाचा विषय नाही. पण, या ग्लासेसचा वापर गुन्ह्याच्या पातळीवर जाणाऱ्या कृत्यासाठी झाला, तर 'अपस्कर्टिंग'सारख्या प्रकारांवर सध्याचे कायदे लागू करता येतात.
मेटा ग्लासेसचे फायदे
बेलफास्टमधील आपल्या दुकानात मेटा ग्लासेस विकणारे नेत्रतज्ज्ञ जेफ मॅककॉनव्हिल म्हणतात की, या ग्लासेसचा 'चुकीच्या पद्धतीने वापर होण्याची चिंता' आहे. पण, या तंत्रज्ञानाचे काही फायदेही आहेत.
ते सांगतात की, त्यांच्या काही रुग्णांसाठी या ग्लासेसमधील मजकूर वाचून दाखवण्याची (टेक्स्ट-टू-स्पीच) सुविधा खूप उपयोगी ठरते. एआयच्या मदतीने त्यांना वर्तमानपत्रातील मजकूर आणि रस्त्यावरील फलकही वाचता येतात.
"दृष्टी कमी असलेल्या माझ्या वृद्ध रुग्णांसाठी हे ग्लासेस खूप मोठा बदल घडवून आणणारे आहेत. ते खरोखरच अप्रतिम आहेत."

मेटाने एका निवेदनात म्हटलं की, कमी दृष्टी असलेल्या किंवा ऐकण्यास अडचण असलेल्या लोकांसाठी हे ग्लासेस उपयुक्त नवीन तंत्रज्ञान देतात. या तंत्रज्ञानाच्या वापरावर मर्यादा घालणे म्हणजे प्रगतीच्या दिशेनं पुढे टाकलेलं मोठं पाऊल मागे घेण्यासारखं ठरेल.
"काही ठिकाणी कोणताही व्हीडिओ काढू नये, हे स्वाभाविक आहे आणि ते योग्यही आहे. पण, अशा नियमांची अंमलबजावणी सर्व ठिकाणी सारखीच झाली पाहिजे."
इन्स्टाग्रामचे प्रमुख ॲडम मोसेरी यांनी नुकत्याच झालेल्या प्रश्नोत्तरांच्या (क्यू अँड ए) सत्रात सांगितलं की, एखाद्याचा गैरफायदा घेण्यासाठी किंवा त्याला त्रास देण्यासाठी कंटेंट पोस्ट केला जात असेल, तर 'आम्ही तो कंटेंट काढून टाकू'.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























