मनोज जरांगे यांना आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली, 'ही' दिली कारणे

मनोज जरांगे

फोटो स्रोत, ANI

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानावर आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. त्यासाठी मुंबईतील आझाद मैदान पोलिसांकडे परवानगीही मागितली. मात्र, पोलिसांनी अनेक कारणांची यादी देत या आमरण उपोषणाला परवानगी नाकारली आहे.

आझाद मैदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु बिडकर यांनी मनोज जरांगे यांना आंदोलनाला परवानगी नाकारताना एक पत्र पाठवत कारणांची यादीच दिली आहे.

यात जरांगे यांच्या मागील वर्षीच्या आंदोलनातील संदर्भ देत गणेशोत्सवादरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं नमूद करण्यात आलं आहे.

परवानगी नाकारताना पोलिसांनी काय म्हटलं?

तुमचा 19 सप्टेंबर 2026 पासून 'मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या संदर्भात आझाद मैदान, मुंबई येथे प्रस्तावित आंदोलन, उपोषण व धरणे' याबाबतचा अर्ज 12 सप्टेंबरला आझाद मैदान पोलीस ठाण्याला मिळाला.

आंदोलनात सहभागी झालेली कोणतीही व्यक्ती, आत्मदहनाचा प्रयत्न करणार नाही किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार नाही किंवा उपोषण करणार नाही असे नमुद करण्यात आले आहे. परंतु तुम्ही 12 सप्टेंबरला अंतरवाली सराटीमध्ये घेतलेल्या सभेमध्ये जाहीर केलं, "खोपोली फायनल पकडून चला, 5व्या दिवशी आपण सकाळी 10 वाजता आझाद मैदानला आमरण उपोषण सुरू करतोय".

तुम्ही केलेल्या अर्जात "आंदोलन व आमरण उपोषण" असे नमूद केले आहे. मागील वर्षी तुम्ही 29 ऑगस्ट 2025 पासून पुढे अनिश्चित कालावधीसाठी आमरण उपोषण सुरू केले होते. यातून माझी खात्री झाली आहे की, तुम्ही 'जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम, 2025 च्या' नियमाचा भंग करणार आहे.

2025 मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे-पाटील मराठा आरक्षणाबाबतच्या सरकारी निर्णयाची माहिती मनोज जरांगे यांना देताना.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, 2025 मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे-पाटील मराठा आरक्षणाबाबतच्या सरकारी निर्णयाची माहिती मनोज जरांगे यांना देताना.

या नियमावलीमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, "कोणत्याही आंदोलनास, एकाच वेळी फक्त एकच दिवसासाठी परवानगी देण्यात येईल. शनिवार, रविवार व इतर शासकीय किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही. तसेच आंदोलनाची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 अशी निश्चित करण्यात आलेली आहे. संध्याकाळी 6 वाजता आंदोलनस्थळ रिकामे करण्याबाबत नमूद आहे.

तुमच्या अर्जामध्ये 19 सप्टेंबरला आमरण उपोषण करणार असल्याचे नमूद केले आहे. हा शासकिय सुट्टीचा दिवस आहे. तुमच्या अर्जामध्ये मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन असे नमूद केले आहे.

2025 मध्ये तुम्हाला जाहीर सभा, आंदोलने व त्या अनुषंगाने देण्यात आलेल्या परवानगीनुसार 29 ऑगस्ट 2025 ला सायंकाळी 6 वाजता आंदोलन स्थगित करणे अपेक्षित होते. परंतु आपण नियमांचे पालन न करता तुमचे आंदोलन 2 सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवले होते. 2025 मध्ये आंदोलन सुरू करण्यापूर्वी तुम्हाला नियमावलीची प्रत देण्यात आली होती. असं असूनही या नियमावलीचा भंग केला होता. त्यामुळे तुमचे 19 सप्टेंबर 2026 चे आंदोलन सायंकाळी 6 वाजता स्थगित होणार नाही हे स्पष्ट होत आहे. यातून माझी खात्री झाली आहे की, तुम्ही 'जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका नियमां"चा भंग करणार आहे.

'गाड्या आहेत लाखात'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

12 सप्टेंबरला अंतरवाली सराटीच्या सभेमध्ये तुम्ही जाहीर केले, "आजच्या आज मुंबईला जाऊ शकता का? नाही, कारण गाड्या आहेत लाखात". यातून स्पष्ट होतं की, तुमच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत होईल.

यापूर्वी 2025 मधील आपल्या आंदोलनामधील ठराविक वाहनांना परवानगी देण्यात आलेली होती. मात्र तुम्ही आझाद मैदान व परिसरामध्ये सुमारे 5000 वाहने आणली. सर्व मुख्य मार्गावर व चौका-चौकात वाहने उभी करून वाहतूक कोंडी व अडथळे निर्माण केले होते. यातून माझी खात्री झालेली आहे की, तुम्ही 'जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम, 2025'च्या नियमाचा भंग करणार आहे.

आंदोलकांची कमाल संख्या 5000 पर्यंतच ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, तुम्ही 12 सप्टेंबरला अंतरवाली सराटी येथील सभेमध्ये जाहीर केले, "आजच्या आज मुंबईला जाऊ शकता का? नाही, कारण गाड्या आहेत लाखात". तसेच "मुंबईत बसण्यासाठी सुद्धा लाखो करोडोंने या" असे आवाहन तुम्ही केले आहे.

2025 मध्ये केलेल्या आंदोलनामध्येही 5 हजार आंदोलकांची मर्यादा ठेवणे बंधनकारक होते. मात्र, 29 ऑगस्ट 2025 ला सुरू केलेल्या आंदोलनात आझाद मैदान येथे सुमारे 40 हजार आंदोलकांचा समावेश केला होता. हे पाहता तुम्ही 5 हजारपेक्षा जास्त आंदोलक आणून नियमभंग केला होता.

'तुमच्याकडून नियमावलीचा भंग जाणीवपूर्वक करण्यात येईल'

14 सप्टेंबरपासून मुंबई शहरात मोठया प्रमाणात गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणेश उत्सवादरम्यान होणाऱ्या भाविकांच्या अलोट गर्दीमुळे मुंबई ही कायम राष्ट्र‌विघातक शक्तीच्या निशाण्यावर राहिलेली आहे.

त्यादृष्टीने अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विविध उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत. या आंदोलना दरम्यान होणाऱ्या अलोट गर्दीमुळे सार्वजनिक सुरक्षिततेच्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनामध्ये बाधा निर्माण होणार आहे.

तुमच्याकडून सर्वोच्च न्यायालयाचे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश तसेच 'जाहिर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम 2025 मधील नियमावलीचा भंग जाणीवपूर्वक करण्यात येईल याबाबत माझी खात्री पटलेली आहे.

तसेच दक्षिण मुंबई परिसरातील शाळा, रुग्णालय, व्यवसाय, न्यायपालिका, सार्वजनिक वाहतूक व सार्वजनिक आरोग्य बाधित होऊन सार्वजनिक सुव्यस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे मी तुमच्या 19 सप्टेंबरपासूनच्या आझाद मैदानातील आमरण उपोषण व आंदोलनाला मागितलेली परवानगी नाकारत आहे, अशी माहिती आझाद मैदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु बिडकर यांनी दिली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)