राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, असा आहे हवामानाचा अंदाज

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने पुण्याच्या घाटमाथा परिसरात रेड अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूरसह राज्यातील इतर भागात हवामानाची काय स्थिती आहे? कोकण, मराठवाडा, विदर्भात कुठे पावसासाठी काय इशारे दिले आहेक, जाणून घ्या.

राज्यात आज (26 जुलै) काही जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाचा तर काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील हवामानाची स्थिती

फोटो स्रोत, X/@RMC_Mumbai

फोटो कॅप्शन, राज्यातील हवामानाची स्थिती

विशेषतः पुण्याच्या घाटमाथा परिसरात रेड अलर्ट जारी केला असून, या भागांत अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. इथे काही ठिकाणी अतीवृष्टीही होऊ शकते.

रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे मुसळधार ते अतिमअतिमुसळधारसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसंच ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. सोसाट्याच्या वाऱ्याच्या काही झोतांचा वेग ताशी 70 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो.

मुंबत आज ढगाळ वातावरण आहे. तर ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून यलो अलर्टदेखील लागू आहे.

कोकण-गोवा जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी, तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यताही सांगितली आहे.

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

विदर्भातील हवामान कसं असेल?

विदर्भात दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

नागपुरात आज दुपारच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.

तसेच, नागपूरसह अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विदर्भातील या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

तर, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.