फ्लॅश फ्लडचा इशारा, पुराचा धोका आणि रेड अलर्ट; महाराष्ट्रात पावसाचा अंदाज काय सांगतो?

फ्लॅश फ्लडचा इशारा, पुराचा धोका आणि रेड अलर्ट; महाराष्ट्रात पावसाचा अंदाज काय?

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या सगळ्या विभागांसाठी हवामानाचा अंदाज काय सांगतो, कुठे रेड अलर्ट दिलाय, जाणून घेऊयात.

पालघर आणि नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे इथल्या अनेक भागांत फ्लॅश फ्लडसाठी हवामान विभागानं इशारा दिला आहे. पालघरसह ठाणे आणि नाशिकमध्ये पुराचा धोका असल्याचं हवामान विभागाच्या फ्लॅश फ्लड बुलेटिनवरून दिसतं

तर, गेल्या 24 तासांत उत्तर कोकण, लगतचा घाट प्रदेश आणि दक्षिण गुजरातमध्ये अनेक ठिकाणी अत्यंत तीव्र अतीवृष्टीच्या घटना घडल्या आहेत.

23 जुलैच्या नोंदीनुसार उंबरगावमध्ये तर 24 तासांत तब्बल 1064 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

म्हणजे मुंबईत 26 जुलै 2005 रोजी जितका पाऊस पडला होता त्यापेक्षा हे प्रमाण जास्त आहे. पालघर तसंच नाशिकच्या घाट प्रदेशातही काही ठिकाणी चोवीस तासांत 250 मिलीमीटर पाऊस पडला आहे तर कोकणात इतर ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणीही जोरदार पावसाची नोंद झाली.

दक्षिण राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या या भागात एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन म्हणजे हवेच्या वरच्या स्तरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आणि त्यामुळे इथे मान्सूनला गती मिळाली आहे.

23 जुलैच्या दुपारी टिपलेल्या सॅटेलाईट दृश्यांमध्ये गुजरातपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दाट ढग जमा झालेले दिसतात.

बीबीसी वेदरच्या अंदाजानुसार, पुढच्या 24 तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात, प्रामुख्यानं घाट प्रदेशात जोरदार ते अतीजोरदार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार 23 जुलैच्या उत्तरार्धात पालघर, ठाणे हे जिल्हे आणि नाशिक व पुण्याच्या घाट प्रदेशात अतीवृष्टी आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसाठी रेड अलर्ट दिला आहे. तर मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक तसंच सातारा आणि कोल्हापूरच्या घाट प्रदेशात ऑरेंज अलर्ट आहे.

सिंधुदुर्ग, पुण्याचा घाट प्रदेश, अहिल्यानगर, नंदूरबार, धुळे, बुलढआणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांतही यलो अलर्ट आहे. तसंच जळगाव, वाशिम, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोलीत मेघगर्जनेसह पावसासाठी यलो अलर्ट आहे.

24 जुलै साठी हवामान विभागानं पुण्याच्या घाट प्रदेशात जोरदार ते अतीजोरदार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. तर पालघर, ठाणे, रायगड हे जिल्हे आणि नाशिक व साताऱ्याच्या घाट प्रदेशात ऑरेंज अलर्ट आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच कोल्हापूरच्या घाट प्रदेशात यलो अलर्ट आहे. नंदूरबार, नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळमध्येही मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.