मुंबई : एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, रात्री उशिरा जेवणानंतर खाल्लं होतं कलिंगड, नेमकं काय घडलं?

- Author, दिपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 3 मिनिटे
मुंबईतील पायधुनीमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चारही जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कुटुंबातील सर्वांना जुलाब आणि उलटीचा त्रास झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे.
कुटुंबातील सर्वांनी रात्री जेवणानंतर उशिरा कलिंगड खाल्लं होतं. त्यामुळं त्यांना विषबाधा झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता स्थानिक डॉक्टरांनी वर्तवली आहे.
मात्र अद्याप शवविच्छेदनाचा अहवाल समोर आलेला नाही. त्यामुळं मृत्यूच्या नेमक्या कारणाबाबत माहिती अस्पष्ट आहे. पोलीस याबाबत तपास करत असून अन्न आणि कलिंगडाचे नमुने घेतले आहेत.
या कुटुंबानं 25 एप्रिल रोजी रात्री साधारण दहा ते साडे दहा वाजता काही नातेवाईकांसह जेवण केलं होतं.
त्यानंतर नातेवाईक गेल्यानंतर रात्री उशिरा सुमारे दीड वाजता त्यांनी कलिंगड खाल्ल्याची माहिती असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
या प्रकरणात नेमकं काय घडलं? जाणून घेऊया.
नेमकं काय घडलं?
पायधुनी परिसरातील जुनी इमारत असलेल्या मोघल इमारतीत पहिल्या मजल्यावर हे कुटुंब राहत होतं.
अब्दुल्ला डोकाडिया(40 वर्षे), त्यांच्या पत्नी नसरीन डोकाडिया (35वर्षे) तसंच 16 आणि 13 वर्षे वयाच्या दोन लहान मुली असं हे कुटुंब होतं.
यापैकी तिघांचा जेजे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे.
तर लहान मुलीला घरातून जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत असतानाच तिचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक डाॅ. झैद कुरेशी यांनी दिली आहे.
25 एप्रिल रोजी नातेवाईकांसह सगळ्यांनी रात्रीचं जेवण केलं होतं. नातेवाईक गेल्यानंतर सुमारे दीड वाजता या सगळ्यांनी कलिंगड खाल्ल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
यानंतर पहाटे कुटुंबातील सर्वांना उल्टी आणि जुलाब असा त्रास सुरू झाला. यावेळी इमारतीतील लोकांनी त्यांच्या मदतीसाठी प्रयत्न केले.

याच इमारतीत चौथ्या मजल्यावर राहणारे डाॅ. झैद कुरेशी यांनी तत्काळ त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली.
डाॅ.कुरेशी घटनास्थळी पोहचले त्यावेळी खोलीत चारही जण अत्यावस्थ होते, अशी माहिती डाॅ. कुरेशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
"यावेळी चौघांपैकी सर्वात लहान मुलीला श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं मला दिसलं. तिला तत्काळ सीपीआर दिला. परंतु परिस्थिती तशीच राहिल्यानं जवळच्या रुग्णालयात नेलं. त्यावेळी तिचा मृत्यू झाला.
तर इतर तिघांना स्थानिक रुग्णालयातून नंतर जेजे रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे काही तास त्यांच्यावर उपचार सुरू होते. नंतर त्यांचा मृत्यू झाला," अशी माहिती डाॅ कुरेशी यांनी दिली.

दरम्यान, शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नाही. तो आल्यानंतरच विषबाधा झाली आहे का? आणि ती नेमकी कशातून झाली आहे? हे स्पष्ट होईल, असंही ते म्हणाले.
दरम्यान, एमआयएमचे स्थानिक नेते आणि माजी आमदार वारीस पठाण यांनी राज्य सरकार आणि पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करावी असं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पोलिसांनी काय माहिती दिली?
या प्रकरणी जेजे पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की," एका कुटुंबातील चारही जणांचा मृत्यू झालेला आहे. 25 एप्रिल रोजी रात्री इतर काही नातेवाईकांसह त्यांनी जेवण केलं होतं.
नातेवाईक निघून गेल्यानंतर रात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास त्यांनी कलिंगड खाल्ल्याची माहिती मिळालेली आहे.
यानंतर पहाटेपासून त्यांना उल्टी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथून जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु या चौघांचाही दुर्देवी मृत्यू झालेला आहे."
"पोस्ट माॅर्टम करण्यात आलेलं आहे. त्यांनी खाल्लेल्या पदार्थांचे नमुने पोलिसांनी जप्त केले आहेत. कलिंगडाचेही नमुने घेण्यात आले असून त्यांच्या शरीरातील नमुनेही घेतले आहेत. या प्रकरणी मृत्यूबाबत चौकशी सुरू आहे," असं पोलिसांनी सांगितलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























