60 फुटांचा ऑक्टोपस- ज्याच्या प्रजातीने गाजवलं एकेकाळी समुद्रावर वर्चस्व, नव्या संशोधनातून काय आलं समोर?

फोटो स्रोत, Yohei Utsuki, Department of Earth and Planetary Sciences, Hokkaido University
- Author, हेलन ब्रिग्ज
- Role, सायन्स प्रतिनिधी
- वाचन वेळ: 3 मिनिटे
नवीन संशोधनानुसार, डायनासोर पृथ्वीवर फिरत असताना सुमारे 10 कोटी वर्षांपूर्वी प्रचंड आकाराच्या ऑक्टोपसांनी प्राचीन महासागरांवर वर्चस्व गाजवलं असावं.
सुरुवातीचे ऑक्टोपस शक्तिशाली परभक्षी होते असे मानले जाते. त्यांच्या मजबूत हातांनी ते शिकार पकडत आणि चोचीसारख्या जबड्यांनी इतर प्राण्यांच्या कवच व हाडं खात असत.
अतिशय चांगल्या प्रकारे जतन झालेल्या काही जबड्यांच्या नव्या अभ्यासानुसार, त्यांची लांबी सुमारे 19 मीटरपर्यंत (अंदाजे 60 फूट) पोहोचत होती. तज्ज्ञांना वाटतं की हे सर्वांत मोठे अपृष्ठवंशीय असावेत.
अनेक दशकांपासून, पॅलेन्टोलॉजिस्ट मानत होते की महासागरातील सर्वात मोठे परभक्षी हे पृष्ठवंशीय मासे आणि सरपटणारे प्राणी होते, तर ऑक्टोपस आणि स्क्विडसारखे अपृष्ठवंशीय प्राणी दुय्यम भूमिकेत होते.
अर्वाचीन ऑक्टोपस कसे होते याची जी प्रतिमा वैज्ञानिकांच्या मनात होती त्याला जपानच्या होक्काईडो विद्यापीठाच्या संशोधनाने आव्हान दिले आहे.
या ऑक्टोपसच्या जबड्यांचे जीवाश्म अवशेष सापडले आहेत. त्याचे विश्लेषण केल्यावर असं लक्षात आलं की हे महाकाय ऑक्टोपस समुद्रात पोहून मोठे मासे आणि समुद्री सरपटणाऱ्या प्राण्यांची शिकार करत असत. त्यांचे कठीण कवच आणि सांगाडे देखील ते भेदू शकत असत.
या संशोधनातून असं लक्षात आलं की या ऑक्टोपसच्या शरीराची लांबी 1.5 ते 4.5 मीटर्स ( अंदाजे - 5 ते 15 फूट) इतकी होती. आणि मग ऑक्टोपसचे हात जर मोजले तर ते 7 ते 19 मीटर्स ( 23 ते 62 फूट ) एवढे असू शकतील असा संशोधकांचा अंदाज आहे.

फोटो स्रोत, Getty Images
जरी आपण असं समजलं की हे ऑक्टोपस अगदी 23 फुटांचे होते (वैज्ञानिकांच्या अंदाजानुसार जी श्रेणी सांगितली आहे त्यातील किमान लांबी) तरी देखील आजच्या काळातील ऑक्टोपस प्रमाणे ते महाकायचं ठरतात.
आणखी एक लक्षवेधी बाब म्हणजे जीवाश्म स्वरूपातील जबड्यांवरील झीज डावीकडून उजवीकडे सारखी नाही. यावरून हे प्राणी खाताना एका बाजूचा जास्त वापर करत असावेत, असा अंदाज आहे.
जिवंत प्राण्यांमध्ये शरीराच्या एका बाजूचा अधिक वापर हा प्रगत मेंदूच्या कार्याशी संबंधित मानला जातो.
'ऑक्टोपस - एक हुशार प्राणी'
सध्याचे ऑक्टोपस त्यांची बुद्धिमत्ता, जटील प्रश्न सोडवण्याची क्षमता आणि गुंतागुंतीचे शिकारी तंत्र अवगत असणे यासाठी ओळखले जातात.
आधुनिक ऑक्टोपस त्यांच्या बुद्धिमत्ता, समस्या सोडवण्याची क्षमता आणि गुंतागुंतीच्या शिकारी तंत्रांसाठी ओळखले जातात.
आज अस्तित्वात असलेली सर्वात मोठी प्रजाती 'जायंट पॅसिफिक ऑक्टोपस' असून त्याच्या हातांचा विस्तार 5.5 मीटरपेक्षा (अंदाजे 18 फूट) जास्त असू शकतो.
व्हीडिओ फुटेजमध्ये हे प्राणी एक मीटरपेक्षा जास्त लांबीच्या शार्कवरही हल्ला करताना दिसतात.
या संशोधनाचा आढावा घेणारे झ्युरिक विद्यापीठातील पॅलेंटोलॉजिस्ट ख्रिश्चन क्लुग म्हणाले, "त्यांच्या हातांमुळे आणि सक्शन कप्समुळे ते अशा प्राण्याला घट्ट पकडू शकतात आणि त्यातून सुटका शक्य नसते."
मात्र अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. या प्राण्यांचा नेमका आकार, त्यांच्या परांची (फिन्स) लांबी किती होती किंवा ते किती वेगाने पोहत होते याबाबत शास्त्रज्ञ निश्चितपणे माहिती देऊ शकत नाही तर केवळ त्यांना अंदाज लावता येईल.
त्यांच्या पोटात अन्नाचे जीवाश्म अवशेष सापडले नाहीत त्यावरुन त्यांच्या आहार काय होता याचा निश्चित पुरावा मिळेल.
बाथ विद्यापीठातील पॅलेंटोलॉजिस्ट डॉ. निक लाँगरिच यांनी सांगितले की, त्यांच्या मते हे प्राणी मुख्यतः अमोनाइटची ( गोगलगायीसारखे समुद्री जीव ज्यांची प्रजाती आता लुप्त झाली आहे) शिकार करत असावेत.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र आधुनिक ऑक्टोपसप्रमाणेच, ते संधीसाधू आणि अधाशी शिकारी असावेत. संधी मिळाल्यास इतर शिकारही त्यांनी सोडली नसती.
"हे पूर्णपणे समजून घेण्यासाठी अजून वेळ लागेल," ते म्हणाले. "हे अजूनही काहीसं गूढ आहे."
सध्या उपलब्ध जीवाश्मांमधून प्राचीन समुद्रात फिरणाऱ्या एका प्रचंड प्राण्याची झलक मिळते. त्याच्याकडे शक्तिशाली हात, चिरडून टाकणारे जबडे आणि इतर मोठ्या शिकाऱ्यांशी स्पर्धा करण्यास मदत करणारा मेंदू असावा.
हे संशोधन 'सायन्स' या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



























