केमोथेरपी आणि केस गळती : उंदरांवरील नवीन संशोधनातून वैज्ञानिकांच्या हाती आले आश्चर्यकारक निष्कर्ष

माझ्यासारख्या महिलांसाठी केस गळतीवरील उपचारांमधील या प्रगतीचा काय अर्थ आहे?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, व्हिक्टोरिया डर्बीशायर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 10 मिनिटे

माझे केस गळण्यास सुरुवात झाल्याचा तो क्षण मला स्पष्टपणे आठवतो.

एका शनिवारची संध्याकाळची वेळ होती. मी एका हॉटेलच्या रूममध्ये होते. तिथे गुडघे जमिनीवर टेकवून बाथटबमध्ये वाकून माझे केस धुवत होते. माझ्या एका मैत्रिणीच्या 40 व्या वाढदिवसाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी माझी तयारी सुरू होती. त्याच्या 17 दिवसांआधी माझ्या स्तनांच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी होणाऱ्या केमोथेरेपीच्या 6 सत्रांपैकी पहिलं सत्र झालं होतं. मात्र अनेक दिवस माझे केस गळाले नव्हते.

त्यामुळे मला वाटू लागलं होतं की मी कदाचित नशीबवान लोकांपैकी एक असेन.

मात्र केस धुण्यासाठी मी डोक्यावर शॉवर धरला, तेव्हा अचानक पाण्याची धार गडद झाली. कारण माझ्या डोळ्यासमोरच तपकिरी रंगाचे लांबलचक केसांच्या बटा पाण्याचा निचरा होण्यासाठी असणाऱ्या छिद्राभोवती गोळा होऊ लागल्या. ते थांबवण्यासाठी मी काहीही करू शकत नव्हते.

"अरे व्वा," असं मी स्वत:शीच म्हणाले. कारण खरं सांगायचं तर मी त्याची अपेक्षा केली नव्हती.

केमोथेरपी घेत असताना मी कोल्ड कॅप घालत होते. कोल्ड कॅप म्हणजे उपचार घेत असताना केस टिकवून ठेवण्यास मदत होण्यासाठी तयार केलेलं एक थंडगार हेल्मेट. ते प्रत्येकासाठी प्रभावी ठरत नाही, असं मला सांगण्यात आलं होतं.

हे कदाचित नाट्यमय किंवा ऐकायला थोडं अतिशयोक्तीचं वाटेल, मात्र माझ्यासाठी केस गमावणं हे मास्टेक्टॉमीद्वारे स्तन गमावण्यापेक्षाही अधिक वाईट गोष्ट होती. मास्टेक्टॉमीमध्ये शस्त्रक्रियेद्वारे स्तनाच्या पूर्ण किंवा बहुतांश ऊती काढून टाकल्या जातात.

मात्र मला असं का वाटत होतं? कारण माझ्या केसांशिवाय मी 'मी'च राहिले नव्हते. जणूकाही माझं अस्तित्वच हरवलं होतं.

माझे केस गळण्यास सुरुवात होईपर्यंत ते माझ्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहेत, माझी ओळख आहेत याची मला कल्पना नव्हती.

जपानमधील महत्त्वाचं संशोधन

आता जपानमधील वैज्ञानिकांना वाटतं की लाखो लोक तोंड देत असलेल्या केस गळतीच्या समस्येवर उपाय शोधण्याच्या ते कदाचित अगदी जवळ पोहोचले आहेत.

संशोधक याला 'मोठं यश किंवा महत्त्वाचा शोध' म्हणत आहेत. प्राध्यापक ताकाशी त्सूजी यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या एका टीमनं म्हटलं आहे की उंदरांमध्ये केसांच्या वाढीचं पूर्ण चक्र पुन्हा निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. म्हणजेच केस नैसर्गिकरित्या वाढू शकतात, गळू शकतात आणि पुन्हा उगवू शकतात.

व्हिक्टोरिया: "हे कदाचित अतिशयोक्तीचं वाटेल, मात्र माझ्यासाठी केस गमावणं ही गोष्ट मॅस्टेक्टोमीद्वारे स्तन गमावण्यापेक्षाही अधिक त्रासदायक, वाईट गोष्ट होती"

फोटो स्रोत, Victoria Derbyshire

फोटो कॅप्शन, व्हिक्टोरिया: "हे कदाचित अतिशयोक्तीचं वाटेल, मात्र माझ्यासाठी केस गमावणं ही गोष्ट मॅस्टेक्टोमीद्वारे स्तन गमावण्यापेक्षाही अधिक त्रासदायक, वाईट गोष्ट होती"
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

प्रत्यारोपण केलेले केस वाढू शकत असले तरीदेखील शरीरातील नैसर्गिक केसांसारखेच असणारे फॉलिकल्स म्हणजे केस पुन्हा तयार करणं हे अतिशय आव्हानात्मक ठरलं आहे. नैसर्गिक केसांसारखे म्हणजे कालांतरानं वारंवार वाढणारे, गळणारे आणि पुन्हा उगवणारे केस.

कर्करोगावरील उपचार, अलोपेशिया (केस गळती) किंवा वाढतं वय यासारख्या वेगवेगळ्या कारणांमुळे केस गळतीला तोंड देणाऱ्या महिलांसाठी अशाप्रकारे संशोधनात यश मिळून केस गळतीवर उपाय सापडणं हे खूप महत्त्वाचं आहे.

ते एकेकाळी अशक्य मानली जाणारी गोष्ट शक्य असल्याकडे इशारा करतं. म्हणजेच केस गळती थांबवून पुन्हा केस मिळवता येण्याची शक्यता.

जगभरातील लाखो लोक केस गळतीच्या समस्येला तोंड देतात. यासंदर्भातील अभ्यासांनुसार जवळपास एक-तृतियांश महिला त्यांच्या आयुष्याच्या कोणत्या तरी टप्प्यावर केस गळतीच्या समस्येचा अनुभव घेतात.

मग केस गळतीमुळे होणाऱ्या भावनिक परिणामाकडे अनेकदा दुर्लक्ष का केलं जातं, त्याला कमी का लेखलं जातं? केस गळण्याबाबत आपण कशाप्रकारे प्रतिक्रिया देतो त्यामधून आपली ओळख, आपल्या आयुष्यावर आपलं किती नियंत्रण असल्याचं आपल्याला वाटतं आणि आपण स्वत:बद्दल काय विचार करतो याबद्दल काय सांगते?

इतिहासातील केसाचं स्थान, महत्त्व

इतिहास काळात केस क्वचितच फक्त केस राहिले आहेत. म्हणजे त्याचं वेगवेगळ्या प्रकारचं महत्त्व आणि सादरीकरण राहिलं आहे.

प्राचीन इजिप्तमध्ये फारोह आणि कुलीन महिला सुशोभित केलेल्या वेण्यांचे विग घालत असत. त्यातून ते त्यांच्या शक्तीचं प्रदर्शन करत असत. तर मध्ययुगात महिलांचे लांबलचक केसांचा संबंध त्यांचं स्त्रीत्व आणि त्यांच्या सद्गुण, सदाचाराशी जोडलेला होता. तसंच 17 व्या शतकातील पुरुष 'पेरीविग' घालत असत. पेरिविग म्हणजे लांब, दाट कृत्रिम कुरळे केस.

संपत्ती आणि समाजातील उच्च स्थान किंवा दर्जा दाखवण्यासाठी याचा वापर केला जायचा. तर 1920 च्या दशकापर्यंत बॉबकट केलेल्या महिला या महिला स्वातंत्र्य आणि बंडखोरपणाचं प्रतीक बनल्या.

"केसांमुळे आपली ओळख तयार होते, व्यक्तिमत्वाला आकार येतो. ते आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांची जैविक, शारीरिक आणि सामाजिक खूण किंवा चिन्ह असतात," असं मानसोपचारतज्ज्ञ सिल्व्हिया कारासू म्हणतात.

रॉबर्ट कापा यांचा एक फोटो, ज्यात शिक्षा म्हणून मुंडण केलेल्या एका तरुण आईला जमावातून नेण्यात येत आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रॉबर्ट कापा यांचा एक फोटो, ज्यात शिक्षा म्हणून मुंडण केलेल्या एका तरुण आईला जमावातून नेण्यात येत आहे

अर्थातच लोकांची जी पहिली गोष्ट आपल्या लक्षात येते किंवा ज्याकडे आपलं पहिलं लक्ष जातं, ते म्हणजे त्यांचे केस. "केसांवरून अनेकदा त्या व्यक्तीचं लिंग, वंश आणि धर्म ओळखता येतो.

लोकांचं व्यक्तिमत्व, त्यांची ओळख याच्याशी केसांचा इतका घनिष्ठ संबंध असतो की आपण लोकांची वेगवेगळ्या गटात कशाप्रकारे विभागणी करतो यासंदर्भात ते अतिशय महत्त्वाचे ठरतात," असं त्या म्हणाल्या.

केसांचा संबंध आपल्या प्रतिष्ठेशीदेखील जोडलेला असतो. जबरदस्तीनं केस काढून टाकण्याची कृती अनेकदा एखाद्या व्यक्तीची ओळख आणि त्याचं मानवपण हिरावून घेण्यासाठी वापरली गेली आहे.

जर्मनीतील छळछावण्यांमध्ये ज्यू लोकांचं मुंडणं (डोक्यावरचे पूर्ण केस काढून टाकणं) केलं जायचं. त्यांना घालायला कैद्यांचा गणवेश दिला जायचा.

फ्रान्स 1944 मध्ये मुक्त झाला. त्यानंतर आक्रमण, कब्जा करणाऱ्या जर्मनांशी हातमिळवणी किंवा सहकार्य केल्याचा आरोप असलेल्या हजारो महिलांना शिक्षा देण्यासाठी आणि त्यांची मानहानी करण्यासाठी त्यांचे सार्वजनिकरित्या मुंडण करण्यात आलं.

रॉबर्ट कापा यांचा 'द शेव्ह्ड वुमन ऑफ चार्ट्रेस' हा एक अतिशय प्रसिद्ध फोटो आहे. या फोटोमध्ये एक तरुण माता दिसते. ती तिची खिल्ली उडवणाऱ्या, तिची कुचेष्टा जमावातून चालताना दिसते आणि तिच्या कपाळावर स्वस्तिक काढण्यात आल्याचं दिसतं.

केसांना जर सामाजिक आणि भावनिकदृष्ट्या इतका अर्थ, महत्त्व असेल तर केस गळणं इतकं दु:खदायक, वेदनादायी का वाटू शकतं आणि ही प्रक्रिया भविष्यात पुन्हा उलटी होऊ शकेल का, हे जाणून घेण्यासाठी वैज्ञानिकांनी अनेक वर्षे संशोधन केलं आहे, यात आश्चर्य नाही.

'हा फक्त आकर्षक दिसण्याचा, सौंदर्याचा विषय नाही'

'फ्युचर ड्रीम्स' या सेवाभावी संस्थेबरोबरच्या माझ्या 'अँड देन केम ब्रेस्ट कॅन्सर' या पॉडकास्टसाठी मी महिलांचं त्यांच्या केसांसोबतचं नातं कसं आहे, यासंदर्भात महिलांच्या मुलाखती घेतल्या आहेत. या सर्व मुलाखतींमध्ये महिलांनी मला वारंवार एकच गोष्ट सांगितली. ती म्हणजे याचा दिखाऊपणाशी किंवा सौंदर्याशी काहीही संबंध नव्हता.

निकी एल्किंग्टन एक केशभूषाकार (हेअरड्रेसर) आहेत. त्या मला म्हणाल्या की केमोथेरेपी घेत असताना आपले केस गळू द्यायचे नाहीत असा त्यांचा दृढनिश्चय होता.

"हा फक्त दाखवण्याचा, सौंदर्याचा विषय नाही...आणि मला वाटतं की लोकांना तसंच वाटतं. मात्र केस ही तुमची ओळख असते. मला कर्करोग झाला आहे असं दिसायचं नव्हतं," असं त्या म्हणाल्या.

कर्करोगावरील उपचार सुरू असताना केस गळून जाण्यापूर्वी मुंडण करण्याचा निर्णय घेतल्यास त्यामुळे काही महिलांना परिस्थितीवर अधिक नियंत्रण मिळाल्यासारखं वाटू शकतं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कर्करोगावरील उपचार सुरू असताना केस गळून जाण्यापूर्वी मुंडण करण्याचा निर्णय घेतल्यास त्यामुळे काही महिलांना परिस्थितीवर अधिक नियंत्रण मिळाल्यासारखं वाटू शकतं

"हे तर फक्त केसच आहेत. त्यांची काळजी करू नकोस," असं कोणीतरी त्यांना सांगणं ही त्यांच्यासाठी सर्वात वाईट गोष्ट होती.

नताशा अँडरसन शाळेत परिचारिका आहेत. त्यांना दोन अपत्ये आहेत. त्यांनी सांगितलं, लहानपणी त्यांना केसांशी खेळायला, त्यावर वेगवेगळे प्रयोग करायला खूप आवडायचं. "एखाद्या आठवड्यात मोठे ॲफ्रो (गोलाकार स्वरुपातील कुरळ्या केसांची केशरचना) असायचे. मग त्यानंतरच्या आठवड्यात हेअर एक्सटेन्शन्स लावलेले असायचे," असं त्या म्हणाल्या.

"ते फक्त केस नव्हते. ती माझी संस्कृती होती," असं त्या पुढे म्हणाल्या.

कर्करोग आणि केस गळती

केमोथेरपीमुळे केस गळण्याच्या शक्यतेला सामोरं जावं लागणार असं दिसल्यावर त्यांनी त्यांच्या भावाला त्यांचं मुंडण करण्यास सांगितलं.

"केस काढले जात असताना मला एकप्रकारे मुक्त झाल्यासारखं वाटलं. मी त्या परिस्थितीवर माझं नियंत्रण मिळवलं होतं...केस गळताना पाहणं ही अधिक वेदनादायी आणि अस्वस्थ करणारी बाब होती," असं त्या म्हणाल्या.

केमोथेरपीच्या वेळेस कोल्ड कॅप घालूनही व्हिक्टोरिया यांचे 50 टक्के ते 75 टक्के केस गळाले

फोटो स्रोत, Victoria Derbyshire

फोटो कॅप्शन, केमोथेरपीच्या वेळेस कोल्ड कॅप घालूनही व्हिक्टोरिया यांचे 50 टक्के ते 75 टक्के केस गळाले

कर्करोगाच्या बाबतीतील सर्वात कठीण गोष्टींपैकी एक म्हणजे निदान असो, उपचार असो की दुष्परिणाम असो यातील कोणत्याही गोष्टीवर तुमचं फारसं नियंत्रण नसतं.

काही महिलांच्या बाबतीत केस गळण्याआधीच मुंडण करणं हा त्यांच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवल्याचा आभास किंवा जाणीव पुन्हा मिळवण्याचा एक मार्ग ठरतो.

माझ्या उपचाराच्या वेळेस मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की केस गळण्याबद्दलच्या चिंतेला किती वारंवार वरवरची बाब म्हणून फेटाळलं जात होतं.

"तू केसांची काळजी का करते आहेस? तू जिवंत आहेस." हा एक योग्य प्रश्न आहे. हो, मी त्यातून वाचले हे माझं नशीबच होतं. मात्र आजारातून वाचणं आणि स्वत:च्या व्यक्तिमत्वाचा एक भाग गमावल्याचं दु:ख करणं, या एकमेकांना छेद देणाऱ्या किंवा विरोधात असणाऱ्या गोष्टी नाहीत.

सिल्व्हिया कारासू यांनी मला सांगितल्याप्रमाणे आपल्यापैकी अनेकांसाठी केस गळणं हे 'आजारी व्यक्तीचं लक्षण असतं'.

केसांचा विग आणि त्यातून मिळणारा दिलासा

केमोथेरपी घेत असताना माझे 50 टक्के ते 75 टक्के केस गळाले.

ती अतिशय निराशाजनक गोष्ट होती. मला आठवतं की मी रिचमंडमधील एक विग सलूनमध्ये बसले होते. त्या सलूनच्या मालकीण ॲमी हॉल्ट माझ्या गुंता झालेल्या केसांमधून हळूवारपणे कंगवा फिरवत होत्या. त्यावेळेस ते केस मोठ्या गुच्छ्यांमध्ये गळून पडत होते. ते पाहून मला रडू येत होतं.

डाएन ट्रुसन, नॉटिंगहॅम विद्यापीठात वैद्यकीय संशोधक आहेत. त्यांच्या मते, आजाराचं निदान झालेलं असल्यावर त्याच्यात पुन्हा केस गळणं हा एक 'दुहेरी धक्का किंवा आपत्ती' असते.

"तुम्हाला कर्करोग झाल्याचं सांगितलं जातं. मग तुमच्यावर उपचार सुरू होतात. मग तुमच्याबरोबर ही अतिशय कठोर, वाईट गोष्ट घडते. त्यामुळे लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. शस्त्रक्रिया आणि अत्यंत वेदनादायी उपचारांमधून जात असताना या एका अतिरिक्त समस्येला तुम्हाला तोंड द्यावं लागतं," असं त्या म्हणाल्या.

केसांचा विग मिळवणं ही माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट होती. त्यामुळे मला दररोजचा टीव्हीवरचा बातम्यांचा कार्यक्रम सादर करता येणार होता. माझं मुंडण केलेलं डोकं किंवा डोक्यावर बांधलेला स्कार्फ पाहून लोकांचं लक्ष कार्यक्रम किंवा बातम्यांवरून विचलित व्हावं असं मला वाटत नव्हतं. त्यासाठी केसांचा विग वापरणं हाच सर्वोत्तम पर्याय होता.

ॲमी यांनी माझ्यासाठी एक विग तयार केला. विगसाठी त्यांनी खरे केस वापरले होते. महिलांनी दान केलेल्या किंवा विक्री केलेल्या केसांचा वापर यासाठी करण्यात आला होता. पहिल्यांदा विग पाहिल्यावर ते विलक्षण, स्वप्नवत वाटलं.

तो विग अगदी माझ्या खऱ्या केसांसारखाच दिसत होता. त्यातील केसांचा रंग, त्याची कापण्याची पद्धत, लांबी सर्व खऱ्या केसांसारखंच होतं. मला अविश्वास वाटत होता आणि माझ्या मनात भावनांचा कल्लोळ होता. एका क्षणी डोळ्यात अश्रू येत होते तर दुसऱ्या क्षणी आनंद होत होता. कारण या विगमुळे मला माझं दैनंदिन काम सुरू ठेवता येणार होतं.

माझ्यासारख्या महिलांसाठी केस गळतीवरील उपचारांमधील या प्रगतीचा काय अर्थ आहे?

विज्ञानाकडे अजूनही उत्तर का नाही

केस गळती का होते याबाबत अजूनही वैज्ञानिकांना पूर्ण आकलन झालेलं नाही.

क्लेअर हिगिन्स इम्पीरियल कॉलेज लंडनमध्ये टिश्यू इंजिनीअरिंगच्या प्राध्यापिका आहेत. त्यांच्या मते, केस गळतीवरील संशोधनांना अनेक वर्षांपासून निधी मिळवण्यासाठी आणि त्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. विशेषकरून महिलांच्या संदर्भातील अभ्यासाच्या बाबतीत ही अडचण आहे.

"महिलांच्या बाबतीत निश्चितच कमी संशोधन झालं आहे," असं त्या म्हणाल्या.

त्या म्हणाल्या की बहुतांश अभ्यास पुरुषांच्या केस गळतीवर केंद्रित आहे. यामागचं एक कारण म्हणजे पुरुषांच्या बाबतीत हेअर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे टाळूचे सॅम्पल मिळवणं वैज्ञानिकांसाठी अधिक सोपं झालं आहे.

"याबाबतीत पुरुष आणि महिला यांच्यावर अनेकदा एकाच प्रकारे उपचार केले जातात. कारण लोक गृहित धरतात की ती सारखीच समस्या आहे. मात्र असं असावं, असं मला वाटत नाही," असं त्या म्हणाल्या.

वैज्ञानिकांना केस गळतीबद्दल असणारी बहुतांश माहिती पुरुषांवर करण्यात आलेल्या अभ्यासातून मिळाली आहे, असं क्लेअर हिगिन्स म्हणतात
फोटो कॅप्शन, वैज्ञानिकांना केस गळतीबद्दल असणारी बहुतांश माहिती पुरुषांवर करण्यात आलेल्या अभ्यासातून मिळाली आहे, असं क्लेअर हिगिन्स म्हणतात

पुरुषांमधील केस गळण्याच्या पॅटर्नबाबत (मेल पॅटर्न हेअर लॉस) झालेल्या मोठ्या जनुकीय अभ्यासांकडे त्या लक्ष वेधतात. याचं वैशिष्ट्यं म्हणजे कपाळावरील केसांची रेषा, हेअरलाईन मागे सरकत जाते आणि डोक्याच्या वरच्या भागातील केस विरळ होतात.

हे अभ्यास जीनोम-वाईड असोसिएशन स्टडीज म्हणून ओळखले जातात. यात लोकांच्या केस गळतीशी संबंधित जनुकांचा अभ्यास केला जातो. मात्र हे सर्व अभ्यास पुरुषांवरच करण्यात आले होते.

अलीकडेच, जर्मनीतील संशोधकांनी महिलांच्या केस गळतीच्या पॅटर्नच्या अनुवांशिकतेवर अभ्यास केला आहे. या पॅटर्नमध्ये डोक्याच्या वरच्या भागावरील केस गळतात. यात सहभागी असलेल्या जनुकांमध्ये किमान काही प्रमाणात साम्य असेल, अशी वैज्ञानिकांना अपेक्षा होती.

"मात्र तसं दिसून आलं नाही," असं हिगिन्स म्हणतात. या अभ्यासातील निष्कर्षांमधून दिसून आलं की पुरुष आणि महिलांमधील केस गळतीची कारणं वेगवेगळी असू शकतात. (अर्थात ही कारणं कोणती याबद्दल वैज्ञानिकांना अजूनही पूर्ण खात्री नाही.)

"आपल्याला माहित आहे की केसांच्या फॉलिकलमधील पेशी नष्ट होतात. मात्र त्या मृत होतात की दुसरीकडे स्थलांतरित होतात हे आपल्याला माहित नाही. केस गळती का होते या प्रक्रियेबद्दल आपल्याला खूपच कमी माहिती आहे," असं त्या म्हणतात.

केस गळतीसंदर्भात एक नवी आशा

त्यामुळेच जपानमधील प्राध्यापक त्सूजी यांचं काम महत्त्वाचं आहे. ते आणि त्यांच्या टीमा वाटतं की या कोड्यातील हरवलेला दुवा किंवा भाग त्यांना सापडला आहे.

दीर्घ काळापासून, वैज्ञानिकांना वाटत होतं की केसांची वाढ पेशींच्या दोन मुख्य प्रकारांमुळे होते. या दोन पेशी म्हणजे एपिथेलियल स्टेम सेल्स आणि डर्मल पॅपिला सेल्स.

एपिथेलियल स्टेम सेल्स आधी हेअर फॉलिकल तयार करतात. तर डर्मल पॅपिला सेल्स कधी वाढ सुरू करावी याचे संदेश केसांना देतात.

या पेशी प्रयोगशाळेत केसांची वाढ करू शकत नाहीत. त्या फक्त त्वचेवर केसाचं रोपण केलं जातं आणि त्यांना त्याखालील ऊतींशी जोडलं जातं तेव्हा केसांची वाढ करू शकतात.

मात्र त्सूजी म्हणतात की त्यांच्या अभ्यासातून पेशींचा 'नोव्हेल थर्ड सेल टाईप' शोधण्यात आला. याला हेअर फॉलिकल रीजनरेटिव्ह सपोर्टिंग सेल म्हणतात. म्हणजे केसांच्या मूळाची पुन्हा वाढ होण्यास मदत करणाऱ्या पेशी.

महत्त्वाचं म्हणजे या नवीन पेशी वैज्ञानिकांना प्रयोगशाळेत केस वाढवण्याच्या शक्यतेच्या एक पाऊल आणखी जवळ आणू शकतील.

"सोप्या भाषेत सांगायचं तर आमच्या अभ्यासातून अशी पेशी शोधण्यात आली जी केसांच्या फॉलिकलच्या विकास, वाढ आणि पुनरुत्पादन करण्यास मदत करतात," असं त्सूजी म्हणाले.

त्सूजी म्हणतात की हे निष्कर्ष म्हणजे 'एक महत्त्वाचा शोध' आहे. तो अलोपेशियावर उपचारांमध्ये एक संभाव्य महत्त्वाचं वळण ठरू शकतो.

क्लेअर हिगिन्स या अभ्यासात सहभागी नव्हत्या. त्यांना हे संशोधन महत्त्वाचं वाटतं. त्या म्हणतात की आधीच्या संशोधनांमध्ये प्रयोगशाळेत फक्त अपूर्ण किंवा अर्धवट हेअर फॉलिकल्स तयार करणंच शक्य झालं होतं.

"यापूर्वी कोणालाही अशाप्रकारे केसांचे फॉलिकल्स यशस्वीरित्या तयार करता आले नव्हते. जे फॉलिकल्स वाढ, स्थैर्य, गळती आणि पुन्हा वाढ होण्याचं नैसर्गिक चक्र पूर्ण करू शकतील असे फॉलिकल्स निर्माण करता आले नव्हते. त्यामुळे ही खरोखरंच मोठी प्रगती आहे," असं त्या म्हणतात.

दुसऱ्या शब्दात सांगायचं तर नैसर्गिक केसांप्रमाणेच हे फॉलिकल्स किंवा केसांची मूळं पुन्हा पुन्हा केस वाढवण्यास, त्यांची गळती होऊ देण्यास आणि पुन्हा नवीन केसांची वाढ करू शकत होते.

'आम्ही उपायाच्या खूप जवळ पोहोचलो आहोत'

हे संशोधन फक्त उंदरांवरच करण्यात आलं होतं. त्यासाठी मुख्यत: त्यांच्या मिशांमधील पेशींचा वापर करण्यात आला होता. या संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षांचा वापर मानवाच्या बाबतीत करणं अजूनही कठीण आहे. कारण मानवी केसांची वाढ होण्याची प्रक्रिया खूप अधिक गुंतागुंतीची असते.

तरीदेखील त्सूजी याबाबत आशावादी आहेत. "आम्हाला वाटतं की पूर्वीच्या तुलनेत आता आम्ही या समस्येवरील उपायाच्या खूप जवळ पोहोचलो आहोत," असं ते म्हणाले.

गेल्या वर्षी मी सोशल मीडियावर एका व्यक्तीची पोस्ट पाहिली. त्यामध्ये प्रिन्सेस ऑफ वेल्स, कॅथरिन यांचा एका कार्यक्रमातील एक क्लोज-अप फोटो होता. त्या पोस्टमध्ये म्हटलं होतं, "तो एक वाईट विग आहे". मला ही गोष्ट विशेषकरून निर्दयी आणि अस्वस्थ करणारी वाटली.

प्राध्यापक त्सूजी यांचं संशोधन आतापर्यंत उंदरांवर करण्यात आलं असून त्यातून आशादायी निष्कर्ष हाती आले आहेत

फोटो स्रोत, Takashi Tsuji

फोटो कॅप्शन, प्राध्यापक त्सूजी यांचं संशोधन आतापर्यंत उंदरांवर करण्यात आलं असून त्यातून आशादायी निष्कर्ष हाती आले आहेत

त्यांच्या कर्करोगाचे कोणते उपचार झाले, त्यांचे केस गळाले होते का किंवा त्यांनी विग घातला होता का, याबद्दल आपल्यापैकी कोणालाही माहित नाही. माझ्यावर ज्यावेळेस केमोथेरपी सुरू होती त्यावेळेस जर कोणी माझ्याबद्दल असं म्हटलं असतं तर मला कदाचित घरातच कोंडून घ्यावंसं वाटलं असतं.

खरं तर, आजारपणात केस गळणं ही गोष्ट कोणीही स्वत:हून निवडत नाही. ती त्या परिस्थितीत आपल्यावर लादली गेलेली असते. त्यामुळेच त्या परिस्थितीचा स्वीकार करणं आणि मानसिकदृ्ट्या त्याच्याशी जुळवून घेणं ही खूपच कठीण गोष्ट असते. किमान माझ्यासाठी ती तशी होती.

ती महत्त्वाची बाब आहे. कारण केस म्हणजे आपल्यासाठी फक्त केस नसतात.

आपल्यापैकी अनेकांसाठी केस हे आपली ओळख असतात, आपलं खासगीपण असतं, आपल्याला परिस्थितीवर नियंत्रण असल्याची आणि आत्मविश्वास देणारी बाब असते. त्यामुळेच जेव्हा मी म्हणते की केस खूप महत्त्वाचे का असतात, तेव्हा कृपया ते समजून घ्या.

अतिरिक्त वार्तांकन: फ्लोरेन्स फ्रीमन

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)