'पेपरफुटीचा फायदा होतो' म्हणणाऱ्या निर्मला सीतारामनांवर विरोधकांची टीका; नेमकं काय म्हणाल्या?

फोटो स्रोत, David Talukdar/NurPhoto via Getty Images
दिल्लीतील जंतरमंतर येथे मागील काही आठवड्यांपासून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशव्यापी आंदोलन सुरू आहे.
देशभरातील तरुण आणि विद्यार्थी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत.
यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता सातत्याने जेन झी पिढीशी आणि याच वयोगटातील आंदोलनकर्त्यांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
तर, दुसरीकडे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पेपफुटीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
गुरुवारी (24 जुलै) सीतारामन यांनी म्हटलं होतं की, पेपरफुटीच्या घटनेमुळे सुरुवातीला विद्यार्थ्यांना धक्का बसला. मात्र नंतर अनेकांनी अधिक मेहनत घेऊन आपल्या कामगिरीत सुधारणा केली.
त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस, कॉकरोच जनता पार्टी आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांच्यासह इतर अनेक पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.

फोटो स्रोत, Narinder NANU / AFP via Getty Images
सीतारामन यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना म्हटलं होतं की, "सरकारने त्या घटनेनंतर वेळेत कारवाई केली नसती, वेळेत अटक झाली नसती, वेळेवर अटक केली नसती, पुनर्परीक्षा घेतली नसती आणि घटनेनंतर वेळेत निकाल जाहीर केला नसता, तर आज अनेक तरुणांना पुढील शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या संस्थांमध्ये प्रवेश मिळाला नसता. हे सर्व होत असताना काही तरुण स्वतः पुढे येऊन सांगत आहेत की, पेपरफुटी झाल्याने सुरुवातीला मला दुःख झाले होते. पण नंतर मी त्याचा फायदा घेतला, अधिक मेहनत केली. त्यामुळे माझी कामगिरी सुधारली आणि मला चांगले यश मिळाले. अनेक तरुणांनी या परिस्थितीशी दोन हात करून चांगलं यश संपादन केलं."
सीतारमण यांच्या या वक्तव्यावरून रान उठलंय. काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांचं हे विधान असंवेदनशील आणि बेजबाबदार असल्याचं म्हणत टीका केली.
काँग्रेसने सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "ज्या पेपरफुटीमुळे 21 हून अधिक विद्यार्थ्यांचा जीव गेला, ज्याच्या विरोधात लाखो तरुण आंदोलन करत आहेत, त्याच पेपरफुटीचे फायदे सरकार सांगत आहे. हे वक्तव्य म्हणजे मोदी सरकार पेपरफुटी रोखण्याबाबत गंभीर नसल्याचा पुरावा आहे. या सरकारने देशाची शिक्षणव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे."
आम आदमी पक्षानेही सीतारामन यांच्यावर टीका करत म्हटलं, "अर्थमंत्र्यांना परिचयाची गरज नाही. त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत आणि यावेळी त्या पेपरफुटीचे फायदे सांगत आहेत."
झारखंड मुक्ती मोर्चाने देखील त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. पक्षाने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर लिहिले की, "पेपरफुटी हा कर्करोगासारखा गंभीर प्रश्न बनला आहे. झारखंडमधील हेमंत सोरेन सरकार या कर्करोगाचा नायनाट करण्याचे काम करत आहे, पण दुसरीकडे भाजप पेपरफुटीचेही फायदे सांगत आहे."
कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनीही यावर उपहासात्मक प्रतिक्रिया दिली आहे. 'या तर्कानुसार तर देशातील सर्वच परीक्षा पेपरफुटीच्या माध्यमातून व्हायला हव्यात', असं रांका म्हणाले.
पंतप्रधान मोदींचा सलग दुसऱ्या दिवशी रात्री उशिरा व्हीडिओ संदेश, काय म्हणाले?
गुरुवारी त्यांनी एक व्हीडिओ जारी करत तरुणांना आवाहन केलं होतं. या व्हीडिओत त्यांनी पेपरफुटीनंतर त्यांच्या सरकारने उचललेल्या पावलांचा उल्लेख केला. त्यानंतर, तसेच भविष्यात पेपरफुटीसारख्या घटना रोखण्यासाठी सरकार आणखी कठोर उपाययोजना करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
त्यानंतर, काल 24 जुलै रोजी उशिरा रात्री आणखी एक व्हीडिओ शेअर करत त्यांनी तरुणाईशी संवाद साधला.

फोटो स्रोत, facebook/Narendra Modi/Getty Images
विशेष म्हणजे, या दोन्ही व्हीडिओमध्ये त्यांनी "हॅलो फ्रेंड्स" आणि "थँक यू फ्रेंड्स" अशा शब्दांत संवादाची सुरुवात केली.
शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओमध्ये पंतप्रधान मोदींनी 'लोकांनी दिलेल्या सूचनांसाठी धन्यवाद' म्हणत आभार मानले.
याआधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना सोशल मीडियाचा, विशेषतः इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून तरुणांशी अधिक प्रभावीपणे जोडण्याचा सल्ला दिला होता.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी काल 24 जुलै8 रोजी त्यांचं उपोषण सोडलं. वांगचूक यांचं उपोषण केंद्र सरकारच्या दोन मंत्र्यांच्या उपस्थितीत संपुष्टात आलं. त्याचवेळी आंदोलकांवर पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केल्याचे आरोपही होत आहेत.
जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सीजेपीकडून सांगण्यात आलं आहे.
दुसरीकडे, या आंदोलनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात मुंबईसह नागपूर, छत्रपती संभाजीनगर इथे 24 जुलैरोजी तीव्र आंदोलन करण्यात आले. मुंबई, नागपूर येथे आंदोलक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या चर्चेमध्ये सरकारनं आज (25 जुलै) दुपारपर्यंतचा वेळ मागितला असल्याची माहिती सीजेपीच्या प्रवक्त्यांनी काल दिली होती.
सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका म्हणाले म्हणाले, "कॉक्रोच जनता पार्टीनं केलेल्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सरकारनं उद्या दुपारपर्यंतचा वेळ मागितला आहे. सरकार त्यांना लवकरच पदावरून हटवेल, अशी आम्हाला आशा आहे.
तसेच, आत्महत्या केलेल्या NEET परीक्षार्थ्यांच्या कुटुंबियांना भरपाई देणे आणि विद्यार्थ्यांवरील एफआयआर व इतर कायदेशीर गुन्हे मागे घेणे या दोन मागण्यांना सरकारने तत्त्वतः मान्यता दिली आहे", असं रांका यांनी सांगितलंgett.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा नसता, तरुणाईकडून पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली जाईल, असं अभिजीत दिपके यांनी जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलन स्थळावरून बोलताना म्हटलं.
सीजेपीच्या शिष्टमंडळानं केंद्रीय मंत्र्यांशी केलेल्या चर्चेनंतर जंतर मंतरवर उपस्थित आंदोलकांना याबाबत माहिती देण्यात आली.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
























