विधान परिषद : नागपुरात भाजपचा पराभव, काँग्रेसच्या विजयाची 'ही' आहेत 4 कारणं

फोटो स्रोत, Facebook/Abhijit Vanjari
महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.
एकूण 5 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला 3 ठिकाणी, तर भाजपला केवळ 2 ठिकाणी विजय मिळवता आला आहे.
नागपूरच्या निकालाची देशभर चर्चा सुरू झाली आहे. नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होमग्राऊंड असून, तिथेच भाजपला पराभवाची धूळ चाखावी लागली आहे.
काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी सुधाकर कोहळे यांचा पराभव करून विजय खेचून आणलाय. नागपूर पदवीधरची ही निवडणूक चुरशीची ठरलीच, मात्र निकालातही शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक वाढवणारी ठरली.
नागपुरात काँग्रेसच्या विजयाची 4 कारणं
नागपूर पदवीधर निवडणुकीत काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांचा 3240 मतांनी विजय झाला आहे. नितेश कराळे यांना मिळालेल्या पहिल्या पसंतीच्या 25 हजार मतपत्रिकेवर दुसऱ्या पसंतीची सर्वाधिक मतं अभिजीत वंजारी यांना मिळाली. त्यामुळे भाजपच्या सुधाकर कोहळे यांना मागे टाकत वंजारी सलग दुसऱ्यांदा आमदार झाले.
बीबीसी मराठीसाठी नागपुरातून वृत्तांकन करणाऱ्या भाग्यश्री राऊत यांनी नागपूर पदवीधर निवडणुकीच्या निकालाचं केलेलं विश्लेषण :
नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला होता. पण गेल्यावेळी काँग्रेसने या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. यावर्षी भाजपने पूर्ण ताकद लावली. तरीही काँग्रेसने विजयी घौडदौड कायम ठेवली.
काँग्रेसच्या विजयाची कारणं :
1) या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः वैयक्तित लक्ष घातलं होतं. त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या. तसेच बावनकुळे यांनी सुद्धा लक्ष घातलं होतं. फडणवीस, बावनकुळे आणि गडकरी यांनी प्रचार सुद्धा केला होता. मुख्यमंत्री मतदानाच्या दिवशी स्वतः बूथवर फिरले होते. पण भाजपमध्ये उमेदवारीवरून अंतर्गत नाराजी होती. अनिल सोले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मतदानासाठी काही दिवस बाकी असताना मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन त्यांची नाराजी दूर केली. त्यांनी कोहळे यांचा प्रचार करणार असल्याचं सांगितलं. सोले संघाच्या मुशीतून तयार झाले होते. त्यांच्यासोबत एक गट सुद्धा नाराज होता. ती नाराजी उफाळून आली.
2) अभिजीत वंजारी यांची सुधाकर कोहळे यांच्यापेक्षा पदवीधरमध्ये जास्त दबदबा आहे. त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्याचं कॉलेजच्या माध्यमातून विदर्भात नेटवर्क आहे. त्याचा फायदा देखील झाल्याचं बोलले जातं.

फोटो स्रोत, Facebook
3) या निवडणुकीत महत्वाचा फॅक्टर अपक्ष उमेदवार नितेश कराळे होते. ते या निवडणुकीत गेम चेंजर ठरले. सुरुवातीला पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये भाजपचे सुधाकर कोहळे 6 हजार मतांनी आघाडीवर होते. पण नितेश कराळे बाद होऊन त्यांच्या 25 हजार मतपत्रिकावरील दुसऱ्या पसंतीची मतं मोजायला सुरुवात झाली तेव्हा कोहळे यांची लीड कमी झाली. शेवटी वंजारी यांनी 3 हजार 240 मतांनी विजय मिळवला.
4) नितेश कराळेंनी पहिल्या पसंतीची जवळपास 25 हजार मतं घेतली, तर प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांचा विजय देखील कराळे यांच्यावर अवलंबून होता. कारण, तिसऱ्या क्रमांकाची मतं त्यांना होती त्याची संख्याही जास्त होती. त्यांना मिळालेल्या पहिल्या पसंतीच्या मतपत्रिकेवर दुसऱ्या पसंतीची मतं कोणाला आहेत यावर विजयी उमेदवार ठरला. एकूणच नितेश कराळे या निवडणुकीचे गेमचेंजर ठरले.
'कराळे फॅक्टर' इतका कसा चालला?
पण कराळे फॅक्टर इतका कसा चालला? यामागे तीन कारणं आहेत.
एक म्हणजे, निवडणुकीच्या एक दिवसांपूर्वी नितेश कराळे यांची राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यावेळी कराळे मास्तरांचा रडणारा व्हीडिओ व्हायरल झाला होता. यामुळे त्यांना सहानुभूती मिळाल्याचं बोललं जातंय. जो प्रचार आधी झाला नव्हता तो या एका दिवसात फिरल्याचीही चर्चा होती.
दुसरं म्हणजे, सोशल मीडियावर सक्रीय आहेत. त्यांनी जास्तीत जास्त प्रचार सोशल मीडियावरून केला. महत्वाचं म्हणजे आतापर्यंत जी विद्यार्थी आंदोलनं झाली, कॉक्रोच जनता पार्टीची आंदोलनं झाली त्यामध्ये कराळे नागपुरात असो किंवा दिल्ली सगळ्या आंदोलनात सहभागी होते. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला तेव्हा त्यांनी आवाज उठवला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात येऊन तसेच सोशल मीडियावरून त्यांनी सत्तेतल्या नेत्यांना जाब विचारला. यामुळेही त्यांची लोकप्रियता वाढल्याचं बोललं जातंय.

फोटो स्रोत, Facebook/Nitesh Karale
तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे, नागपूर पदवीधर मतदारसंघावर भाजपनं सर्वाधिक राज्य केलं. गेल्या टर्मला काँग्रेसला संधी मिळाली. पण, आतापर्यंत पदवीधरांचे प्रश्न सुटू शकले नाहीत, त्यांचे बेरोजगारीचे प्रश्न मांडले गेले नाहीत असा आरोप होतोय. त्यावरून कुठंतरी या दोन्ही प्रस्थापिक पक्षांविरोधात नाराजी होती. दोन्ही पक्षातील नाराज गट कराळेंकडे वळला. त्याचा फायदा देखील कराळेंना झाला.
महाविकास आघाडीची निकालात सरशी
पुणे आणि अमरावतीमधील शिक्षक मतदारसंघात, तर पुणे, नागपूर आणि मराठवाड्यातील पदवीधर मतदारसंघात निवडणूक पार पडली. या पाचही ठिकाणचा निकाल असा लागला :
शिक्षक विभाग मतदारसंघ : विजयी उमेदवार
- पुणे : कौस्तुभ गावडे (महायुती- भाजप)
- अमरावती : किरण सरनाईक (महायुती : शिवसेना)
पदवीधर विभाग मतदारसंघ : विजयी उमेदवार
- मराठवाडा : डॉ.प्रतापसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार)
- पुणे : हर्षदा देशमुख-जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार गट)
- नागपूर : अभिजित वंजारी (काँग्रेस)
पुण्यात पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत हर्षदा देशमुख यांनी भाजपच्या स्मिता जाधव यांचा पराभव केला आहे. हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यामधील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. स्मिता जाधव यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षप्रवेश केला होता.

फोटो स्रोत, X/Harshada Deshmukh
'हे' होते लक्षवेधी उमेदवार
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत स्मिता जाधव, हर्षदा देशमुख, कौस्तुभ गावडे, सचिन सानप, सतीश चव्हाण, अभिजित वंजारी अशी काही लक्षवेधी नावं या निवडणुकीत उमेदवार म्हणून होती.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या एकूण पाच जागांच्या निवडणुका झाल्या. त्यात पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती या विभागातील मतदारसंघ आहेत.
23 ऑक्टोबरला मतदान पार पडलं आणि त्यानंतर 27 ऑक्टोबरला मतमोजणी सुरू झाली. या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. या पाचही मतदारसंघांत 150 हून अधिक उमेदवार रिंगणात होते. मात्र, त्यातील लक्षवेधी चेहरे आणि प्रमुख उमेदवार कोण होते, हे पाहूया.

फोटो स्रोत, Facebook
1) पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ
- कौस्तुभ गावडे : भाजप - विजयी
- जयंत आसगावकर : काँग्रेस
- सचिन सानप : शिवसेना पुरस्कृत
- दत्तात्रय सावंत : अपक्ष
- पी.बी.रोंगे : अपक्ष
2) पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ
- डॉ. स्मिता जाधव : भाजप
- हर्षदा देशमुख-जाधव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) - विजयी
- सुनील मोदी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
3) नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ
- सुधाकर कोहळे : भाजप
- अभिजीत वंजारी : काँग्रेस - विजयी
- नितेश कराळे : अपक्ष
4) अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ
- आदिती पोहरे : काँग्रेस
- दत्तात्रय लहाने : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
- किरण सरनाईक : शिवसेना (शिंदे) - विजयी
- दिलीप कडू : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ
- श्रीकांत देशपांडे : अपक्ष
- शेखर भोयर : अपक्ष
5) छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघ
- सतीश चव्हाण: राष्ट्रवादी काँग्रेस
- दिलीप घुगे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
- डॉ. प्रतापसिंह पाटील : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) - विजयी
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

























