अमोल मुझुमदार एक्सक्लुझिव्ह : 'ICC T20 वर्ल्ड कपमध्ये कोणत्याही टीमला कमी लेखून चालणार नाही'

अमोल मुझुमदार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार
    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी
    • Reporting from, मुंबई
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

12 जूनपासून ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होतेय. त्यासाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झालेला आहे.

वर्ल्ड कपसाठीची टीमची तयारी, वन-डे वर्ल्डकप जिंकल्यानंतरच्या 6 महिन्यांतले अनुभव - महिला क्रिकेटमध्ये झालेले बदल या सगळ्याबद्दल टीमचे मुख्य कोच अमोल मुझुमदार यांना काय वाटतं?

वर्ल्डकपला जाण्याआधी बंगळुरुच्या BCCI च्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये टीमच्या सराव शिबिरादरम्यान अमोल मुझुमदार यांनी बीबीसी मराठीला व्हर्च्युअल मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या.

नोव्हेंबर 2025 मध्ये टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता टी 20 वर्ल्डकपमध्ये त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या वर्ल्डकपमध्ये भारत ग्रुप A मध्ये आहे आणि ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेसारखे बलाढ्य संघही याच ग्रुपमध्ये आहेत.

या दोन्ही देशांचा दौरा टीमने गेल्या काही महिन्यांत केला. मग टीमसमोर वर्ल्डकपमध्ये सर्वात मोठं आव्हान कुणाचं असेल?

अमोल मुझुमदार सांगतात, "आमची तयारी जोरात आहे. बघूया आता काय होतं. T20 क्रिकेटमध्ये कुणालाही कमी लेखून चालत नाही, यावर माझा विश्वास आहे. कारण तुम्ही जर कुणाला कमी लेखलंत तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागते."

"जगात अशी कुठलीही टीम नाही जी T20 क्रिकेटमध्ये आव्हान देणार नाही. एखाद्या दिवशी क्रिकेटमध्ये अंडरडॉग्सही तितकेच भेदक असतात. त्यामुळे कुणालाही कमी लेखून चालणार नाही, असं मी माझ्या प्लेयर्सना नेहमी सांगत असतो."

पण मग ग्रुपमधल्या मोठ्या आव्हानाचं काय? मुझुमदार म्हणतात, "आमचा ग्रुप स्ट्राँग आहे. ऑस्ट्रेलिया आहे, दक्षिण आफ्रिका - पाकिस्तान - बांगलादेश आहेत. त्यामुळे सगळ्याच मॅचेस महत्त्वाच्या असतील. ICC ट्रॉफीजमध्ये कुठलाच संघ कमी नसतो, कुठलाच संघ मोठा नसतो. ICC ट्रॉफीमध्ये वेगळं प्रेशर असतं. ज्या दिवशी मॅच आहे, त्या दिवशी तुम्ही तो ताण हाताळू शकलात, त्या दिवशी तुम्ही जिंकाल."

इंग्लंडमधलं बदलतं हवामान

यापूर्वी झालेला 2024 चा T20 वर्ल्डकप न्यूझीलंडने जिंकला होता. आपलं जेतेपद राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. तर इंग्लंडच्या टीमकडे घरच्या मैदानांवर, घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याची जमेची बाजू असेल. मग या गोष्टी लक्षात घेत, इंग्लिश वेदर - इंग्लंडमधलं बदलतं हवामान जुळवून घेत खेळणं यासाठी टीम कशी तयारी करते?

कोच मुझुमदार म्हणतात, "आम्ही गेल्या वर्षी इंग्लंडचा दौरा केला होता. तिकडे T20 सीरिज झाली त्यात भारताने पहिल्यांदा इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाला 3-2 ने हरवलं होतं आणि वन-डेमध्ये 2-1 ने हरवलं होतं. असं यापूर्वी कधीच झालं नव्हतं."

"त्यावेळी जवळपास हीच टीम होती. फक्त 2-3 बदल असतील. त्यामुळे तो आत्मविश्वास आहे. इंग्लंडमध्ये खेळायचा अनुभवही आहे. बंगळुरूमधलं हवामान इंग्लंडसारखं नाही पण आम्हाला तयारीसाठी जशी पिचेस हवी आहेत, ती आपण इकडे करू शकतो. साधारण काहीसं हिरवं पिच ज्यावर बॉल थोडासा फिरतो. इंग्लंडसारखं हवामान तयार करू शकत नाही, पण त्याच्या जवळपास जाऊ शकतो."

अमोल मुझुमदार

अमोल मुझुमदार यांच्याकडचा इंग्लिश क्लब लीग्समध्ये खेळण्याचा अनेक वर्षांचा अनुभव टीमच्या फायद्याचा ठरू शकतो.

"इंग्लंडमधले 2 उन्हाळेच काय, 2 दिवसांचं वातावरणही सारखं नसतं. आम्ही एजबॅस्टन, हेडिंग्ले, लीड्स अशा इंग्लंडच्या उत्तरेच्या भागांत खेळणार आहोत. मँचेस्टर ओल्ड ट्रॅफर्डला 2 मॅचेस आहेत. त्यामुळे देशाच्या उत्तरेकडच्या भागांबाबत काहीच अंदाज बांधता येत नाही."

"हवामान बदलतं आणि त्यावर कुणाचंच नियंत्रण नाही आणि मी नेहमी सांगतो - Control the controllable. ज्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणं शक्य आहे, त्यावरच ठेवा. त्याबाहेरच्या गोष्टींबद्दल तुमच्या हातात काही नाही," मुझुमदार म्हणतात.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका दौरा

वर्ल्ड कपसाठी इंग्लंडला जाण्याआधी 2026 मध्ये टीम इंडियाने 2 महत्त्वाचे दौरे केले. फेब्रुवारी - मार्चमध्ये ऑस्ट्रेलिया आणि एप्रिल महिन्यांत दक्षिण आफ्रिका. पण या दोन्ही देशांत टीमला फार मोठं यश मिळालं नाही. पण या दौऱ्यांमधून काय शिकायला मिळालं, यावर टीम भर देत असल्याचं मुझुमदार सांगतात.

ते म्हणतात, "या दौऱ्यातून काय शिकलो आणि या टीमला सुधारणा करण्यासाठीच्या कोणत्या गोष्टी आहेत, याबद्दल आजच आम्ही बोललो. एक नंदिनी शर्मा सोडल्यास दक्षिण आफ्रिकेला जवळपास सेम टीम होती आणि राधा यादव परत आली. या दौऱ्यांच्या सकारात्मक गोष्टी भरपूर होत्या. अनेकदा मॅचमधल्या पराभवातून खूप गोष्टी शिकता येतात आणि आम्ही तसंच शिकलो."

"दुसरी सकारात्मक गोष्ट म्हणजे महिन्याभरापूर्वी आम्ही ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाला हरवून आलो. पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया T20 सीरिज हरली. मला नाही वाटत गेल्या 15-20 वर्षांमध्ये ते कधी हरले असतील. मला आठवत नाही. चर्चा भरपूर झाली, आता त्यावर अंमलबजावणी झाली पाहिजे."

सोशल मीडियावर होणारी चर्चा आणि टीका

नोव्हेंबर 2025 मध्ये भारतीय टीमने वर्ल्डकप जिंकल्यापासून टीमच्या कामगिरीवर असणारं फॅन्स - विश्लेषकांचं लक्ष वाढलेलं आहे.

टी20 वर्ल्ड कपसाठीची टीम जाहीर झाल्यानंतरही या सिलेक्शनबद्दल सोशल मीडियावर चर्चा झाली. टीमला मिळणारा वाढता प्रतिसाद - फॅन फॉलोईंग पाहता BCCI नेही टीम जाहीर झाल्यावर त्याबद्दलचा व्हीडिओ प्रसिद्ध केला.

वर्ल्डकप 2025 टीम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वन-डे वर्ल्डकप 2025
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ही चर्चा - टीका या सगळ्याचा खेळाडूंवर कसा परिणाम होतो?

अमोल मुझुमदार म्हणतात, "पुन्हा तेच - कंट्रोल द कंट्रोलेबल्स. तुम्ही सोशल मीडियावर नियंत्रण ठेवू शकत नाही. महिला क्रिकेटला हे आयबॉल्स हवे होते. अशा प्रकारे सगळ्यांचं लक्ष येणं गरजेचं होतं जे गेल्या 6 महिन्यांमध्ये - वर्ल्ड कप जिंकल्यानंतरच्या 6 महिन्यांत ते प्रमाण प्रचंड वाढलं."

"आम्ही ऑस्ट्रेलियाला गेलो आणि सिडनीला टीम टी20 मॅच खेळत होती तेव्हा स्टेडियम पूर्ण भरलेलं होतं. तिसरी मॅच होती अ‍ॅडलेडला. तेव्हा दोन्ही टीम्सनी 1-1 मॅच जिंकली होती. तिसऱ्या निर्णायक मॅचसाठी फुल हाऊस होतं. टेस्ट मॅच बघायला जवळजवळ 8-10 हजार लोकं आलं होती. लहान मुलं, मोठी माणसं सगळेजण."

"जे आयबॉल्स पाहिजे होते ते आयबॉल्स आता मिळाले. त्या बाबतीत महिला क्रिकेटमध्ये अजूनही खूप सुधारणा होण्याला वाव आहे असं माझं मत आहे. स्क्रूटिनी वाढलेली आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. एक गोष्ट केली की चर्चा सुरू होते. काही प्रमाणात सोशल मीडियाकडे दुर्लक्ष करता येतं, पण सगळ्यांच गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्ही काही चांगल्या गोष्टीही मिळवू शकता. काय घ्यायचं, काय नाही - हे तुम्ही ठरवायचंय."

महिला क्रिकेटमध्ये झालेले बदल, बीबीसीची पाहणी

गेल्या सहा महिन्यांत महिला क्रिकेटसाठी परिस्थिती कशी बदलली, हे बीबीसीने केलेल्या एका अभ्यासातूनही समोर आलंय.

14 राज्यांमधल्या 10,000 पेक्षा अधिक महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या. यानुसार,

  • आपण क्रिकेट खेळतो असं 10 पैकी एका मुलीने सांगितलं.
  • आठवड्यातून आपण किमान एकदा क्रिकेट खेळतो असं 40 टक्के जणींनी सांगितलं.
  • कोणत्यातरी खेळात करियर करण्याचा विचार असल्याचं 15 - 24 वयोगटातल्या 26 टक्के मुलींनी सांगितलं.
  • गेल्या 6 महिन्यांत महिलांचा एखादा खेळ लाईव्ह पाहिल्याचं 43 टक्के जणींनी सांगितलं.

महिला क्रिकेटर्सचं वाढतं फॅन फॉलोइंग

याबद्दल अमोल मुझुमदार त्यांची निरीक्षणं सांगतात, "बदल माझ्या घरातच आलाय. इतकी वर्षं आमच्या घरी मी आलो की क्रिकेट इतकं बघितलं जायचं नाही. पण आता मी आलो आणि टीव्ही सुरू असेल तर कोणता ना कोणता खेळ सुरू असतो. माझी बायको आपल्या महिला टीमची खूप मोठी फॅन झाली आहे."

"दुसरी गोष्ट म्हणजे या क्रिकेटर मुली जेव्हा बाहेर जातात म्हणजे फक्त ग्राऊंडवरच नाही तर एअरपोर्टवर किंवा डिनरला, तिथेही फॅन फॉलोइंग खूप झालंय. हा मस्त बदल आहे. म्हणजे आमची रिचा - रिचा घोष आहे. छोटी आहे, 20 - 22 वर्षांची. तिचं खूप फॅन फॉलोइंग आहे."

"शेफाली वर्माला एक वेगळं फॅन फॉलोइंग आहे. या क्रिकेटर्सचे कट्टर फॅन्स तयार झाल्याचा बदल माझ्या लक्षात आलाय. म्हणजे हे फक्त जेमी, स्मृती वा हरमन वा दीप्तीबद्दल नाही, इतरांबद्दलही आहे. क्रांती गौडचंही एक वेगळं फॅन फॉलोइंग आहे."

"एक बदल म्हणजे या वर्षी मी IPL पाहत होतो आणि IPL बघता बघता स्मृतीच्या जाहिराती पाहत होतो वा हरमनची अ‍ॅड होती. ते पहायला इतकं छान वाटलं. कधी कधी मी स्वतःलाच चिमटा काढतो, मी अनेकदा हे म्हटलंय की या प्रचंड टॅलेंटेड टीमचा भाग होता येणं माझं भाग्य आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या सगळ्या 15 जणी माणूस म्हणून खूप चांगल्या आहेत."

महिला क्रिकेट टीम

फोटो स्रोत, Getty Images

पण अमोल मुझुमदारांनी 2023 मध्ये महिला संघाचे मुख्य कोच म्हणून जबाबदारी घेतली, त्यावेळी त्यांचा दृष्टीकोन काय होता?

ते म्हणतात, "जेव्हा मी या पोस्टसाठी अर्ज केला तेव्हा भारतीय महिला संघ किंवा भारतीय पुरुष संघ या दृष्टीकोनातून मी बघितलंच नाही. मी इंडियन क्रिकेट टीम बघितली. मी फक्त आणि फक्त भारतीय क्रिकेटची सेवा करणार या दृष्टीकोनातून मी या पदाकडे पाहिलं."

"मी जे विराटशी बोलीन किंवा रोहित शर्माशी बोलीन तेच मी हरमनशी बोलीन. तेच मी स्मृती मंधानाशी बोलीन. काही गोष्टी वेगळ्या आहेत हे खरं आहे. पण ती त्या परिस्थितीची गरज आहे आणि ते करणं तुमचं काम आहे. आपलं काम नीट नियमितपणे पार पाडणं, हाच दृष्टीकोन असतो. मग ती स्मृती असेल, हरमन असेल कोणीही असेल."

WPL मुळे झालेला बदल

महिला क्रिकेटला नवी उंची देणारा आणखी एक टप्पा म्हणजे - WPL - विमेन्स प्रीमियर लीग. भारतीय क्रिकेटसाठी WPL गेमचेंजर ठरल्याचं अमोल मुझुमदार म्हणतात. या WPL मधून अनेक खेळाडूंना व्यासपीठ मिळालं आणि त्यातल्या अनेकींची टीममध्ये निवडही झाली.

"आम्ही टॅलंट सर्चसाठी गेलो असतो तर एरवी त्यासाठी बराच वेळ लागला असता. पण WPL मुळे तुमच्या डोळ्यांसमोर काही गोष्टी आहेत. श्रीचरणी, क्रांती गौड WPL मधून आल्या. WPL आणि देशांतर्गत क्रिकेटचा चांगला सीझन असं कॉम्बिनेशन झालं, तर तुमच्यासाठी भारतीय टीमची संधी निर्माण होते."

"सगळ्यांचंच लक्ष WPL वर असतं. कारण एकतर तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवायला वाव असतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी मी कायम पाहतो ती म्हणजे WPL मध्ये तुमचं टेंपरामेंट तपासलं जातं. कारण WPL च्या मॅचेस हाऊसफुल असतात."

"रिकाम्या स्टेडियममध्ये खेळणं आणि पूर्ण भरलेल्या स्टेडियममध्ये खेळणं यात जमीन - आसमानाचा फरक आहे. तिथे जे गर्दीचं प्रेशर असतं तेच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असतं. या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय खेळाचे अनेक फायदे असतात."

स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिक्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिक्स

सध्या अनेक वेगवेगळ्या स्पर्धा होतात, त्यातून अनेक होतकरू खेळाडू पुढे येतात. देशाच्या संघाच्या कामगिरीसाठी हे कसं परिणामकारक ठरतं?

कोच अमोल मुझुमदार सांगतात, " तुमची bench strength चांगली असेल - म्हणजे संघाबाहेर वाट पाहत असलेले खेळाडू चांगले खेळणारे असतील तर मग मुख्य संघाला चांगली कामगिरी करण्याचा दबाव येतो. मग त्यातून तुम्हाला चांगल्या खेळाडूंकडून चांगल्या खेळी होताना दिसतात. त्यामुळे बेंच स्ट्रेंथ चांगली असणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर अमाप काम सुरू आहे. ए टीमच्या टूर्स वाढलेल्या आहेत. आम्ही त्यावर काम करतोय."

पण मग या खेळासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि इतर गोष्टींचा विकास होतोय का? तर गेल्या 2 वर्षांमध्ये काँट्रॅक्ट पद्धतींसह अनेक गोष्टी बदलल्या असून देशांतर्गत क्रिकेटसाठी चांगली ग्राऊंड्स मिळत असल्याचं मुझुमदार सांगतात.

जूनमध्ये इंग्लंडमध्ये वर्ल्डकप पार पडल्यानंतर संघासमोरच्या 2 मोठ्या स्पर्धा म्हणजे सप्टेंबरमध्ये होणारे एशियन गेम्स आणि 2028 ऑलिम्पिक्स ज्यात पहिल्यांदाच क्रिकेटचा समावेश असेल. पण ही दूरची उद्दिष्टं असून सध्या आपलं लक्ष वर्ल्ड कपवर असल्याचं अमोल मुझुमदार म्हणतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)