लैंगिक छळ, हिंसा करणाऱ्या पुरुषांविरोधात इतर पुरुष सहजासहजी का बोलत नाहीत?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठीसाठी
- वाचन वेळ: 6 मिनिटे
खरात प्रकरणाबद्दल वाचून झालं असेलच, एपस्टीन प्रकरणही कानावर आलं असेल, त्यानंतर वैद्यचं प्रकरणही येऊन गेलं.
इंटरनेटवर एक हॅशटॅग वेळोवेळी वरती येत असतो, #notallmen. त्यावर महिला हक्क कार्यकर्त्यांचं उत्तर असतं, #yesallmen.
याचा संदर्भ असा आहे की जरी सर्व पुरुष महिलांचे शोषण करत नसले, तरी बहुतांश पुरुष हे शोषण करणाऱ्या पुरुषांच्या विरोधात स्टँड घेत नाहीत. याबाबत माहिती असूनही तक्रार करत नाहीत, महिलांची बाजू घेत नाहीत.
एपस्टीन फाईल किंवा आपल्याकडचं अशोक खरात प्रकरण, सगळीकडे दिसून आलं आहे की अनेक पुरुषांना या घटनांची माहिती होती, तरीही त्यांनी त्याविरोधात आवाज उठवला नाही. अनेकांनी तर एपस्टीनची बाजू लावून धरली.
एपस्टीन फाईल प्रकरणानंतर इंटरनेटवर एक व्हीडिओ व्हायरल झाला होता, ज्यात महिला विचारतेय की तुमचा मित्र एखाद्या महिलेला त्रास देतोय, तिचं शोषण करतोय किंवा अगदी आपल्या लग्नाच्या बायकोला चीट करतोय हे लक्षात आल्यावर तुम्ही (पुरुष) त्यांची बाजू घेणं सोडता का? उत्तर नाही आलं तर #YesAllMen हा हॅशटॅग सार्थ ठरतो.
याच पार्श्वभूमीवर असे कोणते सामाजिक संदर्भ, साचे असतात ज्यामुळे पुरुष, इतर शोषण करणाऱ्या पुरुषांच्या विरोधात उभे राहात नाहीत हे शोधण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.
दुसरं म्हणजे जितक्या सहजपणे बाईने दुसऱ्या (चुकीच्या ठरलेल्या) बाईची साथ सोडणं, किंवा तिच्या विरोधात जाणं अपेक्षित असतं, तितक्या सहजपणे पुरुषानेही चुकीच्या पुरुषाला विरोध करावा हे का अपेक्षित नसतं?

फोटो स्रोत, Getty Images
प्रा. देवकुमार अहिरे पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागात सहायक प्राध्यापक आहेत आणि समाज, मानवी हक्क, सांस्कृतिक मानववंशशास्त्राचे तसंच लैंगिकतेच्या इतिहासाचे अभ्यासक आहेत.
ते म्हणतात, "यात एक गोष्ट स्पष्टपणे दिसते की जे एक आपलं पेट्रिआर्कल स्ट्रक्चर आहे, त्यात स्त्रियांप्रमाणे पुरुषही त्याचे बळी असले, तरी त्यांना या स्ट्रक्चरचे फायदेही खूप मिळतात. पुरुष हे फक्त व्हिक्टीम नाहीयेत, ते त्याचे बेनेफिशअरीही आहेत. त्यामुळे ते त्या व्यवस्थेच्या विरोधातच बोलत नाहीत.
"जर पितृसत्ताक व्यवस्थेच्या विरोधात जर बोलले, तर त्याच व्यवस्थेमुळे जे फायदे मिळतात, घरात, समाजात, त्या फायद्यांविषयी पण बोलावं लागेल, किंवा ते फायदेही सोडावे लागतील. ते कोणालाच नको असतं. सहज जे मिळतं ते कशाला सोडायचं?"
रेवन कॉनेल (RW Connell) या जेष्ठ सोशोलॉजिस्ट आहेत. त्यांच्या 'मॅस्क्युलिनिटीज' या पुस्तकात त्या लिहितात, "पितृसत्तेच्या रचनेला जे पुरुष आत्मसात करतात, त्याला विरोध करत नाहीत त्यांना 'पेट्रिआर्किल डिव्हीडंड' मिळतो. म्हणजे सामाजिक, आर्थिक, भौतिक फायदे."
त्यापुढे असंही म्हणतात, "स्त्रियांना दुय्यम वागवण्याचे अधिकारही त्यांना या 'पेट्रिआर्किल डिव्हीडंड' मधून मिळतात. त्यामुळे बरोबरीच्या पुरुषाला त्याच्या वागण्यावरून विरोध केला तर हे फायदे हिरावून घेतले जाण्याची भीती असते."
म्हणूनच पुरुष आपल्या आसपासच्या पुरुषांना विरोध करताना दिसत नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. ऐश्वर्या रेवाडकर स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, आणि स्त्रियांचे प्रश्न सतत मांडत असतात. त्याही काहीसं असंच मत मांडतात.
"सत्तास्थानी असलेले पुरुष समाजातील दुर्बल घटकांना वेगवेगळ्या प्रकारे एक्सप्लॉईट करतात, मग ते आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, लैगिंक असेल. ही व्यवस्थाच पुरुषांना फायदा देणारी आहे. जेव्हा यात स्त्रिया यात बळी जातात तेव्हा फायदा घेणारे, किंवा न घेणारे सगळ्याच पुरुषांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या याचा फायदा असतो. त्यामुळेच त्या फायद्याचा विचार करून पुरुष गप्प बसतात."
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समूहाची ओळख.
एका अभ्यासात असं दिसून आलंय की, पुरुषांनी पुरुषांची कोणत्याही परिस्थितीत बाजू घेतली तर त्यांना बक्षीस मिळतं, भले एखाद्या पुरुषाचं वागणं दुसऱ्याला पटलं नाही, किंवा त्याने खाजगीत विरोध केला तरी. कारण जर विरोधात बोललं तर समुहातून बहिष्कृत केलं जाण्याची भीती असते.
पुरुष आपल्यातल्या एका पुरुषाचं हिंसक वागणं संपूर्ण 'समूहाच्या' वागण्याचं प्रतिबिंब आहे' असं समजतात. त्यामुळे अशा वागण्यावर पांघरूण घालून, त्यांच्या विरोधात न जाता ते त्या समुहाची इभ्रत वाचवतात, ज्यामुळे त्यांचीही इभ्रत आहे तशी राहाते.
हीच गोष्ट पुढे आणखी समजावून सांगताना प्रा. अहिरे म्हणतात, "आता #notallmen याबद्दल बोलायचं म्हटलं तर तोही एक प्रकारचा बचाव आहे. एक अशीही भावना असते की भविष्यात कोणी आपल्यावर आरोप केले, तर आपल्याही इतर पुरुषांचा पाठिंबा लागेल, त्यामुळे ते आधीच इतर पुरुषांना पाठिंबा देऊन मोकळे होतात.

पुरुष एक व्यक्ती म्हणून आणि पुरुष एक समुह म्हणून मिक्स होताना दिसतात. ते व्यक्ती म्हणून तसेच वागतात जसे समूह म्हणून वागतील.
एखाद्या पुरुषाला स्वतःला असं वागणं मान्य नसेलही, पण त्याची एकूणच लैंगिक धारणा, लैंगिक नीतिमत्ता, त्या कृतीविषयची ज्ञान हे पारंपारिकच असतं. त्यामुळे दुसऱ्या पुरुषाने केलेल्या अत्याचाराला तो त्याच धारणेतून बघतो, त्या धारणेनुसार काहीच चुकलेलं नसतं, मग तो त्या विरोधात बोलत नाही, उलट बचावच करतो."
'हिलींग फ्रॉम हेट – हाऊ यंग मेन गेट इन अँड आऊट ऑफ व्हायलंट एक्स्ट्रिमिझम' या पुस्तकाचे लेखक मायकल किमेल लिहितात, "पुरुषांचे एकमेकांशी असलेले बंध हे महिलांना (त्यांच्या समुहातून) वगळण्यावर आधारित असतात. आणि (जे घडतंय) त्यावर मौन बाळगणं हा तो डिंक आहे जो यांच्या समूहाला घट्ट जोडून ठेवतो."
किमेल मॅस्क्युलनिटी (पुरुषत्व) यावरही चर्चा करतात. त्यांच्या मते लहानपणापासूनच मॅस्क्युलनिटी मुलग्यांची पाठ सोडत नाही. बहुतांश मुलं मोठी होत असताना या मॅस्क्युलनिटीची मुल्यं उराशी जपत मोठी होतात आणि तीच त्यांची ओळख बनते.
आणि जर एखाद्या कृत्याने हीच ओळख पुसली जात असेल तर ते करायला पुरुष घाबरतात.
जर हिंसेविरोधात काही बोललं तर आपल्याला कमजोर किंवा कृतघ्न म्हणतील अशी भीतीही त्यांना असते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
गंमत म्हणजे, 'जे पुरुष मुळातच स्वतःला इतर पुरुषांच्या तुलनेत कमी 'मॅनली' समजतात, ते उलट महिलांवर होणाऱ्या शारिरीक, लैंगिक हिंसेबाबतीत लवकर विरोध करतात, मध्ये पडतात', असंही या रिसर्चमध्ये म्हटलेलं आहे.
म्हणजे पुरुषत्वाची व्याख्या पुरुषांना हिंसेविरोधात बोलण्यापासून परावृत्त करते.
प्रा. अहिरे म्हणतात, "समाजात आपल्या असं सातत्याने बिंबवलं जातं की, प्रामुख्याने लैंगिक संबंधातच्या बाबतीत, की ते खाजगी असतात, त्याबद्दल बोलायचं नसतं. त्यामुळे त्या अनुषंगाने जे काही होतं, ते नवरा-बायकोमध्ये असो, किंवा संमती देणाऱ्या दोन प्रौढांमध्ये असो, मग त्यात काहीही झालं, शोषण झालं किंवा आणखी काही, तर त्याची वाच्यता करायची नाही, त्याची सार्वजनिक चर्चा करायची नाही, त्याबद्दल कोणी बोलायचं नाही असा एक समज आहे.
आता बोलायचंच नाही म्हटल्यावर कोणी विरोधातही बोलत नाही.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या समाजात लैंगिक संबंध, लैगिंक कृती लैंगिक आनंद, संमती याबद्दलच्या धारणा इतक्या स्टिरिओटिपीकल आहेत, त्या प्रामुख्याने पुरुषाच्या अनुभवावर आधारित आहेत. त्यात प्रामुख्याने पुरुषाचा आनंद केंद्रस्थानी आहे. त्यात स्त्रियांना एजन्सीच नाहीये. त्यामुळे जे घडलं ते चुकीचं नाही असंही पुरुषांना वाटू शकतं."
या लेखाचा उद्देश पुरुषांना टार्गेट करणं नाहीये, त्यामुळे पुरुषांच्या बाजूने बोलायचं झालं तर सगळ्या पुरुषांना महिलांवर अत्याचार करायचे असतात, किंवा ते चांगले नसतात असं नाहीये, पण बहुतांश पुरुष हे एका अशा सामाजिक रचनेचा भाग असतात, जिथे त्यांच्या विरोधावर मर्यादा येतात आणि जर त्यांनी विरोध केला तर त्यांच्याकडे गमावण्यासारखं खूप असतं.
पुरुषांमध्येही सगळ्याच पुरुषांकडे सत्ता, ताकद किंवा पैसा नसतो, त्यामुळे सत्ताधारी पुरुषांच्या विरोधात जाणं हे स्त्री-पुरुष सगळ्यांनाच अवघड जातं.

फोटो स्रोत, Getty Images
पुरुषांचे मौन हे फक्त त्यांचं वैयक्तिक अपयश नाही तर आसपासचे पुरुष, समाज, पुरुषत्वाच्या कल्पना, पुरुषी सत्ता या सगळ्यांच्या दबावाखाली असल्याचा परिणाम आहे.
पण मग नव्या काळात मोठ्या होणाऱ्या मुलग्यांना हा दबाव झुगारायला कसं शिकवणार?
नुसतंच मुलग्यांना चांगलं वागायला, महिलांचा आदर करायला शिकवा असा मोघम सल्ला देऊन उपयोग नाही.
पुरुषत्वाची व्याख्या नव्याने करायला हवी. 'कोचिंग बॉईज इन टू मेन' हा एका प्रयोगात किशोरवयीन खेळाडूंचा अभ्यास केला गेला आणि लक्षात आलं की लिंगसाक्षर असलेल्या कोचमुळे त्यांच्यात मनात पुरुषत्वाची चुकीची व्याख्या रूजली नाही. त्यामुळेच जर कुठे हिंसा, लैंगिक छळ होत असेल तर ही मुलं पटकन मध्ये पडायची.
दुसरं म्हणजे, बऱ्याच मुलांना लहानपणापासून काय चूक काय बरोबर हे माहिती असतं, पण चुकीचं घडत असेल, विशेषतः लैंगिक छळ होत असेल तर काय करावं हे लक्षात येत नाही, अशावेळी काय बोलायचं हे आधीच शिकवायला हवं. उदाहरणार्थ, सेक्सिस्ट जोक केला तर न हसता म्हणायचं, "यात काय हसण्यासारखं आहे," किंवा "त्या मुलीला त्रास देऊ नको, तू जे करतोय ते तिला आवडत नाहीये," ही वाक्यं योग्य त्या ठिकाणी म्हणणं पण शिकवायला हवं.
ग्रीन डॉट प्रोग्राम हा अमेरिकेत खास किशोरवयीन मुलांना हिंसेच्या ठिकाणी नुसतं बघ्याची भूमिका न घेता हस्तक्षेप करायला शिकवतो. असे प्रोग्राम सगळीकडे राबवले गेले पाहिजेत.
तिसरं म्हणजे मुलग्यांना हेही शिकवलं पाहिजे की तुम्ही हिंसा करणाऱ्याच्या विरोधात जाल तर तुम्हाला लोक नाव ठेवतील, कृतघ्न म्हणतील, तुमच्यावर हसतील किंवा तुम्हाला कमजोर म्हणतील. पण याला बळी न पडता स्वतःच्या मतावर ठाम राहा.
अर्थात सगळी जबाबदारी किशोरवयीन किंवा त्यापेक्षा लहान मुलांवर ढकलून चालणार नाही. त्यासाठी समाज म्हणून आपलीही कर्तव्य आहेत. चुकीचं वागणाऱ्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात, हे सार्वजनिकरित्या वारंवार सांगावं लागेल.
हिंसा, लैंगिक छळ करणाऱ्यांना शिक्षा होते, त्यांची बाजू घेणाऱ्यांनाही उत्तरं द्यावी लागतात, हे जेव्हा सतत दिसत राहील तेव्हाच बदल होईल.
(या लेखातील मतं लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



























